अरुण आडिवरेकररत्नागिरी : राज्यातील शिवसेनेत पडलेल्या फुटीचे परिणाम रत्नागिरीतही जाणवू लागले आहेत. रत्नागिरी नगर परिषदेचे २० नगरसेवक आपल्या साेबत आहेत, असे आमदार उदय सामंत सांगत आहेत. तर आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेचे नगरसेवक शिवसेनेसाेबतच असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे नगरसेवक नेमके कुणीकडे, असाच प्रश्न पडला आहे.आमदार उदय सामंत शिंदे गटात सामील झाल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेतील नगरसेवक काेणाच्या बाजूने जाणार हे अजूनही ठरलेले नाही. आमदार सामंत रत्नागिरी दाैऱ्यावर आले असता नगरसेवक त्यांना भेटण्यासाठी गेल्याने राजकीय वादळ उठले. त्यानंतर शिवसेनेने प्रतिज्ञापत्र करून घेत ९ नगरसेवक पक्षातच असल्याचे जाहीर केले. पण, २५ जुलै राेजी पुन्हा आमदार सामंत रत्नागिरीत आले असता शासकीय विश्रामगृह येथे आजी - माजी नगरसेवकांनी भेट घेतली. या भेटीनंतर नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याचा फाेटाे व्हायरल झाला.इतक्या घडामोडींनंतर शिवसेनेचे नगरसेवक बाबा नागवेकर आणि बंटी कीर यांनी विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमाेद शेरे यांची भेट घेऊन आमदार राजन साळवी यांचे घर गाठले. त्यांनी आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले. रत्नागिरीतील नगरसेवक सध्या इकडे आणि तिकडे नाचत असून, हे नेमके काेठे आहेत, यावरच शिक्कामाेर्तब झालेले नाही. त्यामुळे सध्या ‘गेले नगरसेवक कुणीकडे’ नाट्य पाहायला मिळत आहे. सध्या फेसबुक आणि व्हॉटस्ॲपवर या विषयावरुन खिल्लीही उडवली जात असल्याचे दिसत आहे.
एकाच रात्रीत तिकडेआमदार सामंत यांना भेटलेले बाबा नागवेकर व बंटी कीर हे दाेन नगरसेवक त्याच रात्री आमदार साळवींना जाऊन भेटले. त्यामुळे शिवसेनेतील नगरसेवकांना नेमके काय वाटते, त्यांचे नेमके काय चालले आहे, याचेच काेडे साऱ्यांना पडले आहे. सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा आहे.आमदार उदय सामंत म्हणतात...
मतदार संघात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. रत्नागिरी नगर परिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक हे माझ्यासाेबत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाेबत आहेत. आम्ही सर्वजण शिवसेनेतच असून, शिवसेनेत राहूनच मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थन करणार आहाेत. हे सर्व मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. शिवसेना बळकट करणे हेच आमचे ध्येय आहे.
आमदार राजन साळवी म्हणतात...
शिवसेनेचे १७ नगरसेवक अधिकृत चिन्हावर निवडून आले हाेते. ९ नगरसेवक आजही शिवसेनेसाेबतच आहेत. आमदार उदय सामंत यांनी बैठक घेतली. विकासाच्या कामाबाबत त्यांनी ही बैठक घेतती असल्याने बंटी कीर, बाबा नागवेकर हे तेथे गेले हाेते. त्यानंतर ते माझ्या घरी आले आणि त्यांनी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच काम करणार असल्याचे सांगितले. ते दोघेही शिंदे गटात गेलेले नाहीत, शिवसेनेतच आहेत.