रत्नागिरी : तीन वर्षांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी तरुणाला पोक्सो कायद्यांतर्गत मंगळवारी १० वर्षे साधी कैद आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सतीश बाळा इखे (२४, रा. घोडेगाव नेवासा, अहमदनगर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.पीडित मुलीच्या वडिलांनी १५ जून २०१८ रोजी संगमेश्वर पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी पीडिते मुलीसह तरुणाचा सर्व जिल्ह्यात शोध घेतला परंतू, ते कोठेच आढळले नव्हते.
अखेर तब्बल ६ महिन्यांनी १३ डिसेंबर २०१८ रोजी संगमेश्वर पोलिसांनी दोघांनाही औरंगाबादहून ताब्यात घेऊन संगमेश्वरला आणले. त्यानंतर तिच्या वडिलांना बोलावून घेतले असता मुलीने सतीशने आपल्याला फूस लावून नेल्याचे पोलिसांना सांगितले.सतीश इखे हा पीडितेच्या गावाजवळ बांधकामाचे काम करत असताना त्याची तिच्याशी ओळख झाली होती. यातून त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून १५ जून २०१८ रोजी सकाळी ७.१५ वाजता घरातून पळवून औरंगाबादला नेले होते.
त्याठिकाणी त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्याशी लग्न केल्याचे भासवले होते. तो तिच्यासोबत मुंकुंदवाडी रेल्वेस्टेशन येथे राहत होता. याकाळात सतीशने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले होते.