रत्नागिरी : दोन महिन्यांच्या बंदीनंतर आज, गुरुवार, १ ऑगस्टपासून जिल्ह्यातील सागरी मत्स्य व्यवसायात मासेमारी पुन्हा सुरू होणार आहे. सध्याचे पावसाळी वातावरण पाहता मासेमारी लगेचच सुरू होणार की नाही, याबाबत मात्र प्रश्नचिन्हच आहे.नवीन मासेमारी हंगामासाठी मच्छिमार सज्ज झाले आहेत. नौका तसेच जाळ्यांची डागडुजी झाली आहे. मात्र, गेले काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने जिल्ह्यात मुक्काम केला होता. आता पाऊस कमी झाला असला तरी या वातावरणाचा मासेमारीच्या पहिल्याच दिवशी फटका बसण्याची शक्यता आहे. तरीही मच्छिमार आशादायी आहेत.
माशांचा प्रजनन काळसागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली होती. हा काळ माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळं मत्स्य उत्पादन वाढीसाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो. या काळात मासेमारीसाठी नौकांवर बंदी घालण्यात येते. सरकारने घातलेली मासेमारी बंदी कालावधी ३१ जुलैला संपली आहे. गुरुवारपासून मासेमारी सुरू होत आहे.
खरा हंगाम पौर्णिमेनंतरचमच्छिमारांना हवामानाचा अंदाज घेऊन मासेमारीच्या वेळेचे नियोजन करावे लागतंय. १ ऑगस्ट रोजी बंदी उठविली जाणार असली तरी समुद्र शांत नसल्यामुळं बहुतांश मच्छिमार नारळीपौर्णिमेलाच हंगाम सुरू करतात.
अवैध मासेमारीमुळे चिंतागतवर्षीचा मासेमारी हंगाम चांगला नव्हता. त्यामुळे मच्छिमार चिंतेत आहेत, पर्ससीन नेट मासेमारी, एल.ई.डी. अशी या मासेमारी कालावधीत पद्धतीची अवैध मासेमारी, तसेच अवैध मासेमारीमुळे समुद्रातील मासळीचा साठा संपुष्टात आला आहे. त्यासाठी अवैध मासेमारी रोखणे अत्यंत आवश्यक असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
उशिरानेच सुरुवात?राज्य सरकारने १ ऑगस्टपासून मासेमारी सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी ऑगस्टमधील वादळी वारे लक्षात घेता मासेमारीसाठी थोडे उशिराच निघण्याकडे मच्छिमारांचा कल आहे. जिल्ह्यातील मासेमारी नौकांपैकी काही बोटी १ ऑगस्टपासून मासेमारीसाठी सज्ज आहेत. यावर्षी मासळीचा हंगाम चांगला असूदे, अशी प्रार्थना करून मच्छिमार मासेमारीसाठी सज्ज झ्राले आहेत.
नवीन हंगामात मासेमारी नौका सुरू करण्यासाठी लागणारे आर्थिक भांडवल कोठून आणायचं, असा प्रश्न मच्छिमारांसमोर आहे. १ ऑगस्टपासून मासेमारी सुरू होणार असली तरी मच्छिमारांना नौका मालक आर्थिक विवंचनेत आहेत. - इम्रान सोलकर, मच्छिमार नेते, रत्नागिरी