रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन महोत्सवानिमित्त तेरा दिवस अथक कुंचल्यातून प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर रेखाटलेली चित्रे दोन वर्षानंतर पुसट होऊ लागली आहेत. आतापर्यंत जाहिरातींचे फलक असलेली ही चित्रं आता पावसाळा सुरू असल्याने गवत तसेच झाडीमुळे झाकोळली गेली आहेत. त्यांच्या जतनासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत या कलाकारांकडून व्यक्त होत आहे.
रत्नागिरीत २ ते ४ मे २०१५ या कालावधीत पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पर्र्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच पर्यटकांना जिल्ह्याच्या विविध वैशिष्ट्यांची तसेच लोककला, लोकजीवनाची माहिती व्हावी यासाठी येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर तब्बल २८ चित्रे रेखाटण्यात आली होती. सावर्डे येथील सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट आणि देवरूख येथील डी-कॅड या कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सलग १३ दिवस अथक प्रयत्न करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने म्युरल पेंटिंगच्या तंत्राने आकर्षक चित्रांनी या भिंंती रंगवल्या होत्या. जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगा आणि समुद्रकिनाºयांचे नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा लाभलेले गड-किल्ले, मंदिरे, कोकणातील पारंपरिक लोकसंस्कृती आणि खाद्यसंस्कृती, पक्षी, प्राणी, जलचर यांचे जीवन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या (३५० फूट बाय ६ फूट) भव्य अशा नवीन संरक्षक भिंंतीवर आकर्षकरित्या चित्रबद्ध केले होते.
पर्यटक आकर्षित व्हावेत, यासाठी चितारलेली ही चित्रं काही दिवसांतच दुर्लक्षित होऊ लागली. त्यावर थोड्याच दिवसांत कार्यक्रमांची पोस्टर्स, जाहिरातीचे फलक झळकू लागले. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चित्र दिवस - रात्र जागून तेरा दिवसांत साकारली ते प्रसिद्ध चित्रकार प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी या विविध कला जतनाची जबाबदारी येथील विविध कंपन्यांकडे द्यावी, असा मानस व्यक्त केला होता. मात्र, त्याबाबतची कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हजारो रूपयांचा खर्च आणि त्यासाठी चित्रकारांनी घेतलेली मेहनत ही कवडीमोल ठरलेली आहे. यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी प्रयत्न करून या चित्रांचे संवर्धन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरीत मे २०१५मध्ये झालेल्या तीन दिवसांच्या महोत्सव कालावधीत जिल्ह्याची माहिती येणाºया पर्यटकांना व्हावी, यासाठी कलाकारांनी दिवस-रात्र एक करून काढलेली चित्र आज पुसट होत आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. प्रशासनाचे यासाठी लाखो रूपये खर्च झाले असल्याने अजूनही या चित्रांच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत.- प्रा. प्रकाश राजेशिर्के,चित्रकार, सावर्डे