आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. १३ : गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना रत्नागिरीतील बालदोस्त गायक कलाकार अनोखी संगीतमय आदरांजली वाहणार आहेत. किशोरीतार्इंचे निधन झाल्याने त्यांना संगीतसेवेने आदरांजली वाहण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार येथील ‘स्वराभिषेक’ संगीत वर्ग आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीच्या संयुक्त विद्यमाने ‘अवघा रंग एक झाला’ ही मैफल रंगणार आहे. उद्या, शुक्रवारी १४ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के प्रशालेतील विजयालक्ष्मी मलुष्टे रंजन मंदिरात मैफल होणार आहे.‘स्वराभिषेक’च्या संचालिका विनया परब यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे. ‘स्वराभिषेक’ या संगीत वगार्तील शिष्यगण हा कार्यक्रम रंगवणार आहेत. सांगितिक वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांना किशोरीतार्इंच्या गानप्रतिभेची माहिती व्हावी, त्यांच्या रचना विद्यार्थ्यांनी ऐकाव्यात, गाण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्या अतूल्य कामगिरीचे संस्कार व्हावेत असा या कार्यक्रमाचा हेतू आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यशवंतराव पटवर्धन संगीत विद्यालय आणि स्वराभिषेकतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘अवघा रंग एक झाला’ मैफल रत्नागिरीत रंगणार
By admin | Published: April 13, 2017 1:57 PM