वैभव साळकर --दोडामार्ग --दोडामार्ग तालुक्यात महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकारत असलेल्या तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाने दोडामार्ग तालुक्यात कृषीक्रांती होण्यास मदत झाली. पण कोकणसाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या या प्रकल्पाचा दोडामार्गच्या पर्यटन विकासाकरिता मोठा हातभार लागणार आहे. गोवा राज्याला लागून दोडामार्ग तालुका असल्याने पर्यटनासाठी तिलारी प्रकल्प वरदान ठरणारा आहे. तालुक्याच्या आणि पर्यायाने जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने येथील पर्यटनस्थळांचा विकास महत्त्वाचा असून, तिलारी प्रकल्पस्थळी पर्यटनाच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.दोडामार्ग तालुक्यात तिलारी येथे तिलारी नदीवर साकारत असलेला गोवा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचा संयुिक्तक मोठा पाटबंधारे प्रकल्प आहे. यामुळे गोवा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना सिंचनाचा, तर गोवा राज्याला पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठीही पाण्याचा उपयोग होत आहे. या प्रकल्पाचा सुरुवातीपासून मागोवा घेता, तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचा आंतरराज्य करार महाराष्ट्र व गोवा यांच्यात ६ एप्रिल १९९० ला झाला. या करारान्वये प्रकल्पाच्या एकूण सामाईक खर्चापैकी गोवा राज्याने ७३.३ टक्के तर महाराष्ट्र राज्याने २६.७ टक्के खर्च करावयाचे निश्चित झाले आहे. या प्रकल्पापासून दोन्ही राज्यात एकूण २१,१९७ हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. पैकी गोवा राज्यात ३३ गावांतील १४५२१ व महाराष्ट्रातील दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील ७३ गावांतील ६६७६ हेक्टर क्षेत्र आहे. तिलारीच्या प्रकल्पात एकूण साठणाऱ्या ४६२.१७ द.ल.घ.मी. पाण्यापैकी १११.४६५ द.ल.घ.मी. पाण्याची तरतूद गोवा राज्यातील पिण्याच्या पाण्यासाठी व उद्योगधंद्यासाठी करण्यात आलेली आहे. प्रकल्पाच्या कामांच्या सनियंत्रणासाठी दोन्ही राज्याचे जलसंपदामंत्री व सचिव यांचा समावेश असलेल्या आंतरराज्य नियंत्रण मंडळाची २० सष्टेंबर २००९ मध्ये स्थापना झाली आहे.या प्रकल्पासाठी अवघी ४५.२० कोटी इतक्या रक्कमेची मुळ तरतूद होती. आता केंद्राने पंतप्रधान निधीतून ३२० कोटी रूपये दिले आहेत. तिलारी प्रकल्पाच्या मुख्य मातीच्या धरणाचे काम एप्रिल २००६ अखेर पूर्ण करण्यात आले. तर खळग्यातील दगडी धरणाचे काम मे २००९ ला पूर्ण करण्यात आल्याने या धरणात आता पूर्ण क्षमतेने १६.१२ टीएमसी इतका पाणीसाठा करण्यात आला आहे. २००९ च्या पावसाळ्यापासून तिलारीच्या धरणात पूर्ण क्षमतेने ४६२.१७ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, या प्रकल्पातील पाणी गोवा राज्याला २००१ पासून दिले जाते. तिलारी प्रकल्पाचे उजवा व डावा असे दोन कालवे असून, उजवा कालवा २४.६९ व डावा कालवा १८.७९ किलोमीटर लांब असून, त्याची कामे पूर्ण झाली आहे. या दोन्ही कालव्यांना जोडणारा साडेतीन किलोमीटरचा जोडकालवा पूर्ण आहे. साहजिकच दोडामार्ग तालुक्यात तिलारीच्या पाण्यावर कृषीक्रांती होऊ शकते.तिलारीमुळे पर्यटनाच्या संधी उपलब्धतिलारी येथे साकारत असलेल्या महत्त्वाकांक्षी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पामुळे दोडामार्ग तालुक्यात अनेक पर्यटनाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वप्रथम वन्यहत्तीचे वास्तव्य येथे आढळून आल्याने हा परिसर अवघ्या महाराष्ट्राला परिचित झाला.तिलारी व परिसराचा पर्यटन विकास साधल्यास तिलारीचे पर्यायाने दोडामार्ग व सिंधुदुर्गचे पर्यटन वृध्दिंगत होण्यास वेळ लागणार नाही.पर्यटन विकासासाठी प्रस्तावित संधीसिंधुुदुर्ग जिल्हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असल्याने स्थळांना चालना मिळाली आहे.त्याच पार्श्वभूमीवर तिलारी येथे तिलारी प्रकल्पाच्या जलाशयात नौकानयनास उत्तम संधी आहे. पलिकडे केंद्रे गावात निवासी संकुले उभारणे आवश्यक आहे.त्यामुळे निसर्ग व जल पर्यटनाची संधी मिळणार आहे. मात्र, गरज आहे ती प्रामाणिक प्रयत्नांची व सकारात्मक दृष्टीकोनाची. तसे झाल्यास मोठी संधी आहे.४त्यातूनच तिलारी प्रकल्प दोडामार्गच्या विकासासाठी वरदान ठरणार आहे.
कृषीक्रांती झाली मात्र पर्यटनाकडे दुर्लक्ष
By admin | Published: March 17, 2016 11:05 PM