रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर परिषद भवनात पदांची अदलाबदल होणार आहे. बांधकाम व आरोग्य सभापतीपदाचा पदभार नुकताच स्वीकारलेल्या सभापती रेश्मा झगडे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समितीचा भार सोपविण्यात येणार आहे, तर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच उपाध्यक्षांकडे बांधकाम व आरोग्य समिती देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव आणि शिवसेनेचे गटनेते उदय बने यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होता. मात्र, आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर पंचायत समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे आणले. त्यामुळे अध्यक्षपद भास्कर जाधव पुत्र विक्रांत जाधव यांच्याकडे सोपविण्यात आले. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेेल्या बने यांची पक्षाकडून समजूत काढण्यात आली.
बने यांना उपाध्यक्षपद देण्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, जिल्हा परिषदेतील महत्त्वाची खाती बांधकाम समिती आणि आरोग्य समिती या दोन्ही समित्या उपाध्यक्षांकडे देण्याचे निश्चित करण्यात आले. यापूर्वी कृषी आणि पशुसंवर्धन समिती उपाध्यक्षांकडे होती. मात्र, यामध्ये बदल करण्यात येणार असल्याने नवनिर्वाचित बांधकाम व आरोग्य सभापती रेश्मा झगडे यांच्याकडील समित्यांमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन या समित्यांचा पदभार उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर सोपविण्यात येणार आहे.