मुंबई - शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आज रत्नागिरीतून सुरुवात झाली. आदित्य यांच्या स्वागतासाठी रत्नागिरीत ठिकठिकाणी बॅनर झळकले असून, यातील एक बॅनर चर्चेचा विषय ठरला. सध्या गाजत असलेल्य स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुकांत सावंत यांचा फोटो या बॅनरवर असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्यावरुन, खासदार विनायक राऊत यांनी भूमिका मांडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली. आदित्य यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा गद्दार म्हणत निशाणा साधला.
जे झालं ते झालं, जी गद्दारी झाली ती झाली. आजची गर्दी पाहून एवढच सांगू इच्छितो की येथे शिवसेनाचा जिंकून येणार. मला आज याठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला दिसून येत आहेत, म्हणजे येथील महिला भगिनींनाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे, असे म्हणत आदित्य यांनी भाषणाची सुरुवात केली. तसेच, माझा हा कोकणातील दुसरा दौरा असून यापूर्वीही मी कोकण दौरा केला. निष्ठा यात्रेत, शिवसंवाद यात्रेतून मी कोकणात आलो होते. त्यावेळी, या गद्दारांचा मला मेसेज यायचा, मला निरोप यायचा की. आम्हाला विश्वासघातकी म्हणा पण गद्दार म्हणू नका, अहो किती हा निर्लज्जपणा... अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी आणि बंडखोरांवर तोफ डागली.
विधानसभेच्या पायऱ्यावर आम्ही ५० खोके, एकदम ओकेच्या घोषणा देत होतो. त्यावेळी, हे बंडखोर आम्हाला उत्तर देताना म्हणायचे. तुम्हाला पाहिजे का, तुम्हाला पाहिजे का? म्हणजे त्यांनी खोके घेतले हे मान्यच केलं. देशाच्या इतिहासात ७५ वर्षांत एवढा निर्लज्जपणा पाहिलात का, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, ५० खोके एकमद ओके ही घोषणाबाजीही केली. त्यांनी आदित्य ठाकरे ५० खोके.... असं म्हणायचे आणि एकदम ओके... अशा घोषणा उपस्थित लोकं देत होते. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी वेदांता प्रकल्पावरुनही सरकारवर जोरदार निशाणा साधला.