रत्नागिरी : राज्यातील विविध पोलीस स्थानकात मोक्कासह तब्बल ४४ गुन्हे दाखल असलेला कुविख्यात गुंड संदीप उर्फ संदीप्या ईश्वर भोसले याला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेशांतर करून गुंड भोसले याला रत्नागिरी तालुक्यातील पावसनजिकच्या चांदोर येथील एका चिरेखाणी वरून ताब्यात घेतले आहे.खाण कामगार, ट्रॅक्टर चालक म्हणून पोलीस तब्बल तीन दिवस खाणीवर काम करत होते. संदीप भोसले हा विजय नारायण भोसले (रा. वाहिरा, बीड) या नावाने परिसरात वावर होता. गेले अनेक दिवस संदीपने चांदोर येथे वास्तव्य केल्याने त्याने या भागातही चोरीचे गुन्हे केले आहेत का ? त्याचा उलगडा लवकरच होणार आहे.राज्यभरात गुन्हे करुन मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने संदीपने रत्नागिरीतच आश्रयासाठी जागा का निवडली, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. संदीप भोसले याने आपल्या साथिदारांसह दि. ११ जून २०१९ रोजी भरदुपारी पारनेर येथील एका वृद्ध व्यक्तीच्या घरावर दरोडा टाकून सोन्याचा ऐवज लंपास केला होता. त्या गुन्ह्यात संदीप अन्य आरोपींचा समावेश होता.
अहमदनगरच्या कुविख्यात गुंडाला रत्नागिरीत अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 11:24 AM