आवाशी : पावसाळा सुरु झाला की लोटे येथील कंपन्यांना सांडपाणी सोडण्यासाठी जणू काही मुभाच मिळते की काय, अशी परिस्थिती होत असताना त्यात आता पंचक्रोशीला वायू प्रदूषणाचा विळखा बसत असल्याचे दिसून येत आहे.
लोटे - परशुराम (ता. खेड) येथील संपूर्ण रासायनिक स्वरुपात असलेली कारखानदारी जलप्रदूषण करणारी औद्योगिक वसाहत म्हणून स्थापनेपासूनच ओळख निर्माण करणारी ठरली आहे. आजघडीला जरी येथे सामूदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्र कार्यरत असले तरी कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी सोडण्याची प्रक्रिया सुरुच आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फायदा उठवत येथील अनेक कंपन्या नाल्याला वा उघड्यावर पाणी सोडण्याचे दररोज प्रताप करत असतात. दरवर्षीच्या पावसाळ्याप्रमाणे यंदा सुरु झालेल्या पावसात दिनांक ८ जून रोजी मोकळ्या आवारात रासायनिक सांडपाणी पिऊन गुणदे तलारीवाडी येथील यशवंत आखाडे या शेतकऱ्याच्या चार म्हशी दगावल्या तर सहा म्हशी अत्यवस्थ झाल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच दिनांक २१ रोजी पीरलोटे येथील केतकीच्या पऱ्याला रासायनिक सांडपाणी सोडल्याने मासे मरतुकीची घटना घडली. आता हे जलप्रदूषण सुरु असतानाच औद्योगिक परिसरासह महामार्गावरील परिसराला वायू प्रदूषणाचा विळखा घट्ट होत आहे. हे वायू प्रदूषणदेखील या पंचक्रोशीला नवीन नसून, दर पावसाळ्यात हे चित्र आवाशीपासून पीरलोटेपर्यंत पाहायला मिळते. या वायू प्रदूषणाने डोळे जळजळणे, श्वास गुदमरणे, ठसका लागणे अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून भेडसावणाऱ्या या समस्यांचा अजूनही निपटारा होत नाही. हा संपूर्ण त्रास येथील पंचक्रोशीसह महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत असला तरी जवळच असणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वायू प्रदूषणाने येथील नागरिकांना विविध गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये दुर्धर अशा कर्करोगानेही येथील अनेक गावातील ग्रामस्थ त्रस्त आहेत. जल व वायू प्रदूषणाबाबत येथील लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प असल्याने अनेक कंपन्यांचे फावले आहे.