आवाशी : पावसाच्या पाण्याचा फायदा घेत जसे रासायनिक सांडपाणी नाल्याला सोडले जाते तसाच फायदा घेऊन सायंकाळी व रात्री वायू हवेत सोडण्याच्या घटना लोटे (ता. खेड) वसाहतीत सुरू आहे. त्यामुळे आम्ही जगावे की मरावे, असा प्रश्न परिसरातील रहिवासी करत आहेत.
लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण ही समस्या बहुदा कधीच सुटणारी नसावी, अशी भावना आता लोकांच्या मनात तयार होत आहे. अनेक उपोषणे झाली, मोर्चे झाले, आंदोलने झाली, रस्ता रोको झाले. मात्र, ही समस्या कायम आहे. रासायनिक सांडपाण्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली तर वायू प्रदूषणामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले. कर्करोगासह विविध आजारांनी बेजार असणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. रासायनिक सांडपाण्याने शेती, बागायती, मासेमारी संपुष्टात आली तर वायू प्रदूषणाने आरोग्य धोक्यात आले. मात्र, यावर सुधारणा करण्याचा उपाय अजूनही शोधला गेलेला नाही.
सध्या पावसाळा सुरू आहे. याचाच फायदा उठवत लोटे वसाहतीतील कारखानदार राजरोसपणे वायू हवेत सोडत आहेत. खासकरून सायंकाळच्या वेळी, मध्यरात्री व पहाटे वायूचे दाट धुके पसरलेले असते. सोमवारी सायंकाळी एक्सेल कंपनीसमोरच्या रस्त्यापासून थेट एक्सेल फाटा (तालारीवाडी फाटा)पर्यंतचा रस्ता धुक्यात हरवून गेला होता. त्यामुळे या भागात डोळे जळजळणे, श्वास गुदमरणे असा त्रास अनेकांना जाणवत होता. कधीतरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गांभीर्याने याकडे लक्ष देऊन या त्रासापासून लोकांची सुटका करावी, अशी मागणी या परिसरात राहणाऱ्या लोकांकडून केली जात आहे.