..पुन्हा पुन्हा उकळी का देता, यशवंत जाधव यांच्यावरील टीकेबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 01:33 PM2022-03-29T13:33:59+5:302022-03-29T13:34:42+5:30
ज्यांना उद्योग नाही त्यांनी आमच्यावर टीका करायची, आम्ही त्याला उत्तर द्यायचे यातून काय साध्य होणार आहे. राज्यातील जनता काय साध्य करणार आहे, असा प्रश्न विचारला.
खेड : महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे सरकार चालवत आहोत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्याला साथ देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस, बाळासाहेब थोरात आणि त्यांचा काँग्रेस पक्ष करत आहे, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड येथे व्यक्त केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच सरकार चालवत आहे, असा आरोप केला होता. या आरोपाचे खंडन करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी आम्ही सगळे सरकार चालवत असल्याचे सांगितले. खेड येथील रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (दि. २८ मार्च) खेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याची आढावा बैठकही घेतली. या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
बरेचजण आपल्या आईला मातोश्री म्हणतात
यावेळी यशवंत जाधव यांच्यावरील टीकेबाबतही त्यांनी स्पष्टीकरण केले. ते म्हणाले की, एजन्सी ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करते. यशवंत जाधव यांनीच उत्तर दिले आहे की, मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो. बरेचजण आपल्या आईला मातोश्री म्हणतात. काहीजण आई म्हणतात, तर काहीजण मातोश्री म्हणतात. ते स्वत:च म्हणतात, मग त्याला पुन्हा पुन्हा अधिक उकळी का देता, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
ज्यांना उद्योग नाही ते टीका टिप्पणी करतात
आमदार सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेलाही, उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ज्यांना कोणाला उद्योग नाही ते टीका टिप्पणी करतात. असल्या गोष्टीला जास्तीचे महत्त्व देण्यापेक्षा उलट तुम्हाला आनंद झाला पाहिजे की, इथे येऊन आज इतके झटझट निर्णय घेतले आहेत. तीन ते चार सचिवांशी बोलून सूचना दिलेल्या आहेत. त्याला महत्त्व देऊ, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
यातून काय साध्य होणार
ज्यांना उद्योग नाही त्यांनी आमच्यावर टीका करायची, आम्ही त्याला उत्तर द्यायचे यातून काय साध्य होणार आहे. राज्यातील जनता काय साध्य करणार आहे, असा प्रश्न विचारला.ज्याचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे, अशा विधानांना आम्ही उत्तर देऊ, त्यांच्या विधानाला फार महत्त्व देण्याचे कारण नाही, असेही पवार म्हणाले. '