चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर येथे पक्षात दोन गट तयार झाले. अजित पवार गट आणि शरद पवार गट सक्रिय झाल्यानंतर आता दोन्ही गटात शहर कार्यकारिणीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. मात्र काही पदाधिकाऱ्यांची दोन्ही गटात नेमणूक होत आहेत. नेत्यांची नाराजी ओढवण्यापेक्षा निमूटपणे पद स्वीकारलेले बरे, या भावनेतून दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र सकाळी अजित पवार गट, संध्याकाळी शरद पवार गट अशी बिकट परिस्थिती काही कार्यकर्त्यांवर ओढवली आहे.अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर येथील राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली गेली. या पार्श्वभूमीवर आमदार निकम यांनी तातडीने सावर्डे येथे पक्षाची बैठक घेत अजित पवार यांना पाठिंबा देण्यामागील कारण स्पष्ट केले. विकास कामांसाठी निधी या एकमेव कारणासाठी काळजावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला, अशी भूमिका तेव्हा त्यांनी मांडली होती.
मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे नाराज झालेल्या माजी आमदार रमेश कदम यांनी शरद पवार यांना पाठिंबा देत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम करत राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी तातडीने शहरात कार्यकर्ता मेळावाही घेतला होता. तेव्हापासून शहर व ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट सक्रिय झाले आहेत.तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीपासून सुरू झालेली ही चढाओढ आजतागायत सुरूच आहे. दोन्ही गटाचे तालुकाध्यक्ष नेमल्यानंतर तालुका कार्यकारिणीची नेमणूक केली जात आहे. त्यातच आता दोन्ही गटाने शहरात लक्ष केंद्रीत केले आहे. शहराध्यक्षपदाच्या निवडीनंतर शहर कार्यकारिणी निवडली जात आहे.
इधर चला मै उधर चला
- आमदार शेखर निकम यांनी शहरात विकासकामांचा धडाका सुरू केल्याने अनेक पदाधिकारी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यामुळे शहर कार्यकारिणीतही सक्रिय कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून येत आहे.
- मात्र त्यातील काही पदाधिकाऱ्यांची नेमणूक माजी आमदार रमेश कदम यांच्यामार्फत जाहीर होणाऱ्या कार्यकारिणीतही होत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मोठी ओढाताण सुरू झाली आहे.
- सकाळी एका गटाचे पद स्वीकारल्यानंतर संध्याकाळी त्याच पदाधिकाऱ्याला बोलावून घेत दुसऱ्या गटाचे पद दिले जात आहे. त्यातून दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांमध्येच नेमके कोणते पद स्वीकारावे, यावरून धुसफूस सुरू झाली आहे.
- पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आमदार शेखर निकम व माजी आमदार रमेश कदम या दोघांशीही तितकीच जवळीक आहे. त्यामुळे नाराज तरी कोणाला करायचे, हा प्रश्न पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सतावत आहे.
पक्षातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक ही संबंधितांना विचारूनच केली जात आहे. त्यासाठी कोणावरही जबरदस्ती केली जात नाही. पदाधिकारी स्वतःहून पदे स्वीकारत आहेत. तसेच कोणालाही कुठे जाऊ नका, असे आम्ही सांगत नाही. - शेखर निकम, आमदार चिपळूण
काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका चुकीच्या पद्धतीने केल्या जात आहेत. त्यासाठी आपण लक्ष घालून नेमणुका करत आहोत. पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असेल तर ते स्वतःहून याबाबतचा खुलासा करतील. मात्र काम करू इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली जात आहे. - रमेश कदम, माजी आमदार चिपळूण