अजित पवारांच्या बड्या नेत्याला विनातिकीट ठाकरे गटात प्रवेश; कोकणात मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 02:57 PM2024-10-22T14:57:03+5:302024-10-22T14:58:54+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
Ajit Yashwantrao Join UBT : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटपाच्या चर्चा होत असतानाच उपुमख्यमंत्री अजित पवारांना धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मंगळवारी अजित पवारांना जोरदार झटका दिला आहे. राष्ट्रवादीच्या कोकणातील बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजापूर लांजा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे कोकणात अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी झटका दिला आहे. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अजित यशवंतराव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून अजित यशवंतराव यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी तरुण, उमदा, सुशिक्षित आणि मनापासून काम करणारा तरुण शिवसेनेत आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
"काही दिवसांपूर्वी आपण आलात तेव्हा मी त्यांना भेटलो होतो असं विचारलं. सात वर्षांनी तुम्ही शिवसेना परिवारात आलात. कोणतीही राजकीय अपेक्षा न ठेवता पक्षात आला आहात. अनेक जण पक्षात येऊ इच्छितात पण त्यांना तिकीट हवं असतं. तुम्ही विनातिकीट आला आहात. विनातिकीट आल्याने माझी जबाबदारी आहे की तुमचा पुढचा प्रवास सुखकर व्हायला हवा. आताचा काळ आपल्या संघर्षाचा काळ आहे. पक्ष, चिन्ह चोरलेलं आहे. आता आपली नवीन निशाणी मशाल आहे. या निशाणीवर आपले नऊ खासदार निवडून दिलेत. ही मशाल मनामनात पोहोचलेली आणि पेटलेली आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे तसे माझ्याकडे तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसे आहेत. सगळ्यांसमोर सांगतो तुमच्या भविष्याची जबाबदारी माझी आहे," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.