या भन्नाट कल्पनेने आम्ही तर उडालोच; पण मनात एक नवीन विचार सुरू झाला, की असं झालं तर आपण अजरामर व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजे कदाचित आपण हजारो नाहीतर लाखो वर्षे जगू. फक्त शरीर बदलत राहू. पूर्वी जे लोक म्हणायचे शरीर जीर्ण झालं की सदरा बदलल्यासारखा आत्मा शरीर बदलतो हे सत्य आहे की काय, असा संभ्रम निर्माण झाला. मग मात्र आम्ही म्हणालो, बंडोपंत या तुमच्या कल्पनेने माझी मरगळ दूर झाली. काही झालं तर चहा पिऊन जायचं. तसे बंडोपंत खी खी करून म्हणाले, मागच्या सारखा गॅस संपला नाही ना? मी म्हणालो संपला नाही आणि मग आम्ही स्वयंपाकघराकडे तोंड करून म्हणालो, अहो ऐकलं का बंडोपंत आलेत त्यांना एक कप फक्कड चहा करा. आतून भांडी पडल्याचा आवाज नाही आला; पण सायलेन्स मोडवरून व्हायलेन्ट मोडवर जाऊन सौभाग्यवती कडाडल्या. ऐकलं तुमचं सगळं. या कोरोना आणि लॉकडाऊनमधून जगला वाचला तर तुमचा मेंदू कॉपी करायला कोण तरी येईल? बरं हा मेंदू इतका व्हायरसने भरलाय ती हार्डडिस्कसुद्धा करप्ट व्हायची. बंडोपंत भाऊजींनाच अजराअमर करा तुम्ही अजराअमर व्हायची गरज नाही, ऑलरेडी माझ्या माहेरी तुम्ही अजरामर झालाच आहात. सौभाग्यवतीचे हे डिमोटिव्हेशनल स्पिच ऐकून आम्ही तर जमिनीवर धाडकन आदळलो; पण बंडोपंतांचा चेहरा हार्डडिस्क करप्ट झाल्यावर जशी दिसते तसा झाला. मग बंडोपंत म्हणाले, तिकडेपण असंच झालं म्हणून तुम्हाला सांगायला लागलो तर वहिनीसाहेबांची तर सुपरफास्ट गाडी. चला राहू दे चहा. पुन्हा येईन ... अजरामर झालो तर. खी खी खी... बंडोपंत पडलेला चेहरा घेऊन निघून गेले आणि आम्हास आनंदाच्या उकळ्या फुटल्या...
डॉ. गजानन पाटील