दापोली : चिपळूण आणि खेडमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. तेथील गरजू लोकांना, गोरगरीब, नुकसानग्रस्तांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ दापोलीकडून प्रत्यक्ष जाऊन दोनशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
शिक्षक नेते रमाकांत शिगवण यांनी पूरग्रस्तांना साहाय्य करण्याची साद दिली आणि शिक्षकांनी आर्थिक प्रतिसाद देऊन सत्कार्यात लाखमोलाचा वाटा उचलला. मुग्धा सरदेसाई यांच्या एका व्हॉट्सॲप मेसेजवरून एकाच दिवसात सुमारे दोन ते अडीच लाखांचा निधी पूरग्रस्तांसाठी उभारण्यात आला. भविष्यातही मदतीचा हात पुढे करण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे अखिलचे जिल्हाध्यक्ष काटकर यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष विजय फंड आणि संघटनेतील शिक्षक प्रत्यक्ष चिखलातून वाट काढत गरजूंपर्यंत साहित्य सुपुर्द केले.
सर्वत्र पाणीच पाणी होते; पण पाण्यावाचून तडफडणाऱ्या जनतेकडे पाहून मन हेलावून गेल्याचे अध्यक्ष विजय फंड यांनी सांगितले. यासाठी बाबू आग्रे, विवेक कालेकर, भालचंद्र घुले, संदीप गुंजाळ आणि सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. यावेळी रमाकांत शिगवण, सुनील कारखेले, गुलाबराव गावीत यांचेसह सर्व सदस्य उपस्थित होते.