मनाेज मुळ्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून महत्त्वाचा असलेला अक्षय्य तृतीया सण गतवर्षाप्रमाणे यंदाही कोरोनामुळे काळवंडलेलाच ठरणार आहे. विविध प्रकारच्या मोठ्या खरेदीबरोबरच लग्नाच्या मुहूर्तासाठीही हा दिवस महत्त्वाचा असला तरी कोरोना आणि लाॅकडाऊन यामुळे यंदाही हा सण लग्नांच्या मुहूर्ताविनाच जाणार आहे.
सणांच्या परंपरेत अक्षय तृतीया हा खूप मानाचा सण मानला जातो. मोठ्या खरेदीसाठी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या या मुहूर्तावर विवाहही मोठ्या प्रमाणात होतात. मात्र, गतवर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. गतवर्षी कोरोनाची सुरुवात असली तरी त्याबाबत भीती अधिक होती. त्यामुळे अक्षय तृतीया साजरीच झाली नाही. यंदा लोक कोरोनाला सरावले असले तरी आता दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढत असल्याने लाॅकडाऊन लागू आहे. त्यामुळे यंदाचा सणही काळवंडलेलाच आहे.
........................
मे महिन्यातील मुहूर्त
यंदाच्या मे महिन्यात तब्बल १६ दिवशी विवाहाचे ४० शुद्ध मुहूर्त आहेत; पण कोरोना आणि त्यामुळे झालेला लाॅकडाऊन यामुळे या मुहूर्तांवर कुठेही सनईचे सूर मात्र ऐकू येत नाहीत.
..................
सरकारी नियमांचा अडसर
गतवर्षापासून सरकारने विविध कार्यक्रमांवर बंदी आणताना लग्नसोहळ्यांनाही नियम लावले. विवाह सोहळ्याला केवळ ५० लोक उपस्थित राहण्याला परवानगी देण्यात आली. त्यात वेळेचे बंधन नव्हते. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यात उपस्थिती २५ वर आली आहे आणि केवळ दोन तासांचाच वेळ देण्यात आला आहे. इतक्या कमी उपस्थितीत आणि कमी वेळेत लग्न केवळ ‘उरकावे’ लागत असल्याने ते टाळण्यावरच भर दिला जात आहे.
.......................
मंगल कार्यालयांचे गणित बिघडले
रत्नागिरी शहरात चार प्रमुख मंगल कार्यालये आहेत. त्याखेरीज काही ठिकाणी मैदानावर शामियाना उभारूनही लग्न समारंभ थाटात केला जातो.
लाॅकडाऊनमुळे मंगल कार्यालयांचे उत्पन्न पूर्ण थांबले आहे. कामगार इतरत्र जाऊ नयेत, यासाठी त्यांना कामावरून काढून टाकता येत नाही आणि उत्पन्न नसल्याने त्यांना पगार देण्यातही अडचणी अशा कात्रीत मंगल कार्यालयांचे मालक सापडले आहेत.
मंडप डेकोरेटर्स म्हणून काम करणाऱ्यांची स्थितीही बिकट झाली आहे. कामगारांना पगार देणेही आता जिकिरीचे झाले आहे.