दापोली/जैतापूर : गेले चार दिवस वादळी वाऱ्यासह सतत कोसळणाऱ्या पावसाने समुद्रकिनारपट्टीवरील गावांना धोका निर्माण झाला आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या हर्णै पाजपंढरी येथील घरांना समुद्र खवळल्याने धोका निर्माण झाला असून, संपूर्ण जिल्ह्यातील किनारपट्टीच्या गावांना अलर्ट देण्यात आला आहे. आज, शनिवारी सकाळी थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारपासून पुन्हा एकदा जिल्ह्याला झोडपून काढले. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळेही किनारपट्टी भागांचा धोका वाढला आहे. केवळ मच्छिमारच नाही, तर हजारो सर्वसामान्य कुटुंबेही समुद्रकिनारपट्टीवर राहतात. यापूर्वी या कुटुंबांना समुद्रातील वादळ-वाऱ्याचा फारसा फटका बसत नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत होत असलेल्या सागरी अतिक्रमणामुळे, त्सुनामी- सारख्या प्रलयांमुळे समुद्रकिनारपट्टीवरील कुटुंबे अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकली आहेत. दापोली तालुक्यातील हर्णे पाजपंढरी, मुरुड, कर्दे येथील सुमारे २३५ कुटुंबांना महसूल विभागाने स्थलांतराचे आदेश दिले होते. मात्र, पाऊस नसल्याने ही कुटुंबे स्थलांतरित झाली नव्हती; परंतु गेले चार दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अतिवृष्टींची परिस्थिती निर्माण झाल्याने धोकादायक असणाऱ्या कुटुंबांना सावध राहण्याचा व कोणत्याही दुर्घटनेची तत्काळ खबर देण्याच्या सूचना महसूल यंत्रणेकडून देण्यात आल्या आहेत. राजापूर, रत्नागिरी व गुहागर या तीन तालुक्यांतही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
समुद्रकिनाऱ्यावरील गावांना ‘अलर्ट’
By admin | Published: July 13, 2014 12:27 AM