रत्नागिरी : वनखाते आणि कासवमित्र यांच्या सहकार्याने तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ४५ पिल्लांना बुधवारी समुद्रात सोडण्यात यश आले.नोव्हेंबर ते फेबु्वारी या कालावधीत अनेक कासवे रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर अंधारात अंडी घालण्यासाठी येत असतात. कासवमित्र व वन खात्याच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी गस्त घालून, कासवाने घातलेली अंडी संरक्षित करण्याचे काम सुरू झाले.
ही अंडी पुढील ५० दिवस समुद्रकिनारी नेटने बांधलेल्या जाळ्यांमध्ये खड्डा काढून ठेवल्यानंतर जन्माला येणाऱ्या पिल्लांना समुद्रात सोडून देण्यात येते. विभागीय वन अधिकारी विकास जगताप, प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील, सुधीर रिसबूड यांच्या मार्गदर्शनाखाली पिल्लांना समुद्रकिनाऱ्यांवर सोडण्यात आले.५० ते ५५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतातकासव समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालून ती वाळूने झाकून निघून जाते. त्यानंतर खुणांवरून अंड्यांचा शोध घेतला जातो. ही अंडी समुद्रकिनारी तयार केलेल्या उबवणीगृहात ठेवली जातात. साधारण ५० ते ५५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. त्यांना समुद्रकिनारी २० ते २५ फुटांवर सोडण्यात येते.
त्यानंतर ही पिल्ले पाण्यात झेपावतात. मच्छीमारी, समुद्री जीव व अन्य श्वापदे या सगळ्यातून कासव जगण्याचे प्रमाण अत्यल्प असते. त्यासाठी त्यांचे संवर्धन आवश्यक असल्याचे विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांनी सांगितले.