रत्नागिरी : गेला आठवडाभर बोलतोय. त्यामुळे आवाज बसला आहे. तो बरा झाल्यावर पुन्हा बोलणार आहे. मागची सर्व प्रकरणे बाहेर काढणार. मग कोणालाही साेडणार नाही. काय करायचे असेल ते करा, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला. ते रत्नागिरी शहरातील भाजप कार्यालयात पक्षातर्फे आयोजित सत्कार समारंभावेळी बोलत होते. आपल्याच वहिनीवर ॲसिड फेकायला कोणी सांगितले, रमेश मोरे यांची हत्या कशी झाली, यासह अनेक गोष्टी आपण बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे त्यांच्या नशिबी नाही, असा टोला त्यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी काय म्हटले? त्यावेळेला मी तेथे असतो, तर आवाज आलाच असता, यात गुन्हा काय आहे? असा प्रश्न त्यांनी केला. जसे एखाद्या दरोडेखोराला अटक करतात तशी अटक एका केंद्रीय मंत्र्याला केली. काय त्यांचा पराक्रम आहे. काय म्हणायचं याला, अशा शब्दात त्यांनी राज्य शासनाची उडवली. यावेळी त्यांनी आपल्या घरावर हल्ला करणाऱ्यांवरही टीका केली. वरुण सरदेसाई यांना सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राची जनता अनेक विषयांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. पूर परिस्थितीतील चिपळूण, महाड यांना भरपाई मिळालेली नाही. त्यांना पैसे द्यायला राज्य सरकारकडे पैसे नाहीत. मग कसली भाषणे करता? असा प्रश्नही त्यांनी केला. अभिनेता सुशांतसिंह रजपूतची केस अजूनही संपलेली नाही. दिशा सलियानची केसही संपलेली नाही. ही सर्व प्रकरणे टप्प्याटप्प्याने काढणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी माजी मंत्री, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, शाम सावंत, कालिदास कोळंबेकर, जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
आंबे, काजूवाले त्रस्त आहेत. त्यांना आत्महत्या करावीशी वाटते. याची चिड तरी पाहिजेत. कोकणाला दोन वर्षांत काय दिले. काहीही नाही. म्हणून मी माझ्या खात्याच्या माध्यमातून आंबे, काजू व अन्य यांना कर्ज देणार आहे. छोट्याच्या छोट्या उद्योगाला एक कोटी रुपये कर्ज देणार आहे. विकासात्मक कामे आपल्याला करून विकास करायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.