गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध खात्यांच्या कामकाजाविषयी चर्चेबरोबरच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांसाठी एस. टी. सेवा, वीज व रस्त्यावरील खड्डे बुजवण्याविषयी सर्व विभागांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या आवाहनानंतर तालुक्यातून देहदानाचा पहिला अर्ज भरणारे कौंढर येथील प्रभाकर जाधव यांचा पंचायत समितीच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. महावितरणअंतर्गत गुहागर व शृंगारतळी शहरामध्ये वीज वाहिनी पडून अपघात होऊ नये, यासाठी गुहागर व असगोलीसाठी १ हजार ३००, तर शृंगारतळीसाठी १ हजार २०० स्पेसर बसवल्याची माहिती देण्यात आली. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध असल्याची माहिती उपअभियंता यादव यांनी दिली. कृषी विभागांतर्गत कृषी अधिकारी गडदे सभेसाठी कोल्हापूर येथे गेल्याने नवोदित कृषी सेवकाला मासिक सभेत पाठवले. कृषिसेवक आंबेकर यांना सदस्यांनी विचारलेली माहिती देता न आल्याने कृषी विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. गडदे हे आजपर्यंतचे निष्क्रीय कृषी अधिकारी असल्याची संतप्त प्रतिक्रिया सभापती विलास वाघे यांनी व्यक्त केली. यावेळी कृषी विभागाबाबत अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ग्रामीण पाणी पुरवठाअंतर्गत तालुक्यात ११ वाड्यांची नळपाणी योजना नादुरुस्त असून, दुरुस्तीसाठी योजनांना १५ वर्षे वाट पाहायची काय? असा सवाल करत येथे खारी हवा असल्याने पाईपलाईन ५ वर्षातच खराब होतात. याबाबत दखल घेऊन शासनाकडे तसा अहवाल द्यावा, अशी सूचना करण्यात आली. जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील जुन्या इमारतींच्या निर्लेखनाचा प्रस्ताव अधीक्षक अभियंत्यांकडे पाठवल्याची माहिती उपअभियंता देशमुख यांनी दिली. ग्रामपंचायत विभागांतर्गत सेवा केंद्रासाठी ग्रामपंचायतीचे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. बचत गट विभागांतर्गत पंचायत समिती इमारतीबाहेरील बचत गटासाठीच्या गाळ्याचे भाडे जिल्हा परिषदेला द्यायचे. या गाळ्यांची मालकी पंचायत समितीची असल्याने दुरुस्ती करायची नसेल तर यापुढे या गाड्यांचे भाडे देणार नाही, अशी स्पष्ट सूचना सदस्य राजेश बेंडल यांनी दिली. यावेळी सभापती विलास वाघे, उपसभापती सुनील जाधव, प्रभारी गटविकास अधिकारी सुभाष माने, सुरेश सावंत, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र पवार, सदस्य पांडुरंग कापले, साक्षी शितप, गायत्री जाधव, सूचना बागकर, पूनम पाष्टे उपस्थित होते. (प्रतिनिधी) प्रतिक्रिया : एस. टी.चे नियोजन नाही ४नवोदित कृषी सेवकाला मासिक सभेसाठी पाठवल्याने नाराजी. ४प्रश्नांची उत्तरे देताना तारांबळ. ४गडदे हे आजपर्यंतचे निष्क्रीय कृषी अधिकारी; विलास वाघे. ४आबलोली आरोग्य केंद्रासमोर जुन्या इमारतींच्या निर्लेखनाचा प्रस्ताव. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाचे नियोजन नसल्याने वडाप तेजीत आहे, अशी प्रतिक्रिया सदस्यांनी व्यक्त केली. पुरेशा आणि वेळेत बसेस सोडण्यात न आल्याने अनेक प्रवासी वडापकडे वळत आहेत. याकडे एस. टी. महामंडळाने दुर्लक्ष केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
गुहागरात सर्व विभागांना दक्ष राहण्याच्या सूचना
By admin | Published: September 04, 2016 11:20 PM