आरवली : कोरोना प्रतिबंधित नियमावलीमुळे संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील शिमगोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी कडवई परिसर तसेच शिंदेआंबेरी येथे होणाऱ्या पालखी भेटदरम्यान होणाऱ्या सर्व यात्रा रद्द करण्याचा निर्णय कडवई शिंदेआंबेरी गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. धार्मिक विधी हे परंपरेनुसार ठराविक मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थित केले जाणार आहेत.
कडवईतील शिमगोत्सव हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव म्हणून ओळखला जातो. या शिमगोत्सवात काठीच्या साहाय्याने कोणताही आधार न घेता माड उभा केला जातो. हे वैशिष्ट्यपूर्ण दृश्य पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल हाेतात. तर कडवई गावची ग्रामदेवता वरदान देवी व शिंदेआंबेरी गावची ग्रामदेवता चंडिका देवी या बहिणी असून, वर्षातून एक दिवस शिमगोत्सवाच्या वेळी या दोघींची शिंदेआंबेरी येथे भेट होते. या दोन्ही पालख्या एकत्र भेटतात त्यावेळी पालख्यामधील नारळाची अदलाबदल होत असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दोन बहिणींचा हा भेट सोहळा पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी झालेली असते. या दोन्ही सोहळ्यांना मोठ्या यात्रांचे स्वरूप येते. मात्र, यावर्षी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.
मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्शवभूमीवर शासनाने घातलेले निर्बंध व जिल्हाधिकारी यांचे आदेश लक्षात घेऊन कडवई व शिंदेआंबेरी येथील प्रमुख गावकऱ्यांची एक बैठक कडवई ग्रामदेवता मंदिरात संपन्न झाली. या बैठकीत विचारविनिमय करून सर्व संमतीने यावेळी शिमगोत्सवातील सर्व यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व पारंपरिक धार्मिक विधी हे कोरोनाचे नियम पळून मुख्य मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे भाविकांच्या उत्साहावर विरजण पडल्याचे बोलले जात आहे.