रत्नागिरी : बुधवार रात्रीपासून जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू झाल्याने जिल्ह्यातील मुख्य आठही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरातील गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, रात्री पुन्हा जोर प्रचंड वाढला. पाटबंधारे विभागाकडील गुरुवारी संध्याकाळी ५ वाजताच्या अहवालानुसार, खेड तालुक्यातील जगबुडी नदी ७ मीटरवरील धोका पातळी ओलांडून ९.८० मीटरवर पोहोचली होती. चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदीनेही ७ मीटरची धोका पातळी ओलांडली असून, ती ७.८० मीटरवर पोहोचली आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री, सोनवी आणि बावनदी या नद्यांनीही धोका पातळी ओलांडली आहे. शास्त्री नदीची पातळी ७.८० मीटरवरून ८.६० मीटर, सोनवी नदीची पातळी ८.२० मीटर, बावनदी ११ मीटरवरुन १२.९० मीटरवर पोहोचली आहे.
लांजा तालुक्यातील काजळी नदीनेही १८ मीटरची धोका पातळी ओलांडली असून, ती १८.१५ मीटरवर पोहोचली आहे. राजापूर तालुक्यातील कोदवली नदीनेही ८.१३ मीटरची धोक्याची पातळी ओलांडली असून, ती ९.०० मीटरपर्यंत पोहोचली आहे.
जिल्ह्यात गुरूवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे वाटत होते. मात्र, दुपारनंतर पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने पुन्हा पाणी पातळीत वाढ होण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे.