रत्नागिरी : ग्रामीण डाकसेवकांना आठ तामांचे काम देऊन आठ तासांचे वेतन द्या, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ग्रामीण डाकसेवकांनी १२ डिसेंबरपासून सुरू केलेला संप शासनाने मागण्या मान्य केल्याने शुक्रवारी रात्रीपासून मागे घेण्यात आला आहे. शनिवारी १०० टक्के ग्रामीण डाकसेवक कामावर हजर झाले होते.ग्रामीण डाकसेवकांना आठ तामांचे काम देऊन आठ तासांचे वेतन द्या, या प्रमुख मागणीसह कौटुंबिक वैद्यकीय सुविधा बहाल करा, वेतन कमिटीच्या शिफारशीनुसार १२, २४ व ३६ वर्षांच्या सेवेनंतर सरकारी सुविधा द्या व सकारात्मक सुविधा बहाल करा, ग्रॅच्युईटीची रक्कम मर्यादा पाच लाखापर्यंत करा, जुनी पेन्शन सुविधा तत्काळ अमलात आणा, ग्रामीण डाकसेवकांना मिळणारी वीस दिवसांची रजा साठविण्यास परवानगी द्या. व सेवानिवृनीच्या वेळी या रजेचे पैसे रोखीने द्या, अशा विविध प्रकारच्या प्रमुख मागण्यांच्या पुर्ततेसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियन (एआयजीडीएमयू) यांच्या वतीने दि. १२ डिसेंबरपासून देशव्यापी बेमुदत संप सुरू होता.
रत्नागिरी जिल्ह्यात १०५३ ग्रामीण डाकसेवक आहेत. यातील केवळ १४ टक्केच कर्मचारी या संपात सहभागी होते. त्यामुळे पोस्टाच्या कामकाजावर फारसा फरक पडला नाही. नियमित कामकाज सुरळीत सुरू होते. अखेर या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्याने शुक्रवारी रात्र हा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे शनिवारी जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण डाकसेवक कामावर रूजू झाले.