राजापूर : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार बंद राहिल्याने शुक्रवारी राजापूरची बाजारपेठ कडकडीत बंद होती. दरम्यान, प्रशासनाकडून अचानक सर्व दुकाने बंदची सूचना आल्याने अत्यावश्यक सेवेतील दुकानांमधील नाशवंत मालाची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना बसला. मेडिकलसह किराणा मालाची दुकाने बंद असल्याने नागरिकांनाही गैरसोयींचा सामना करावा लागला.
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या हाेत्या. मात्र, शुक्रवारी राजापूर शहरात अत्यावश्यक सेवा देणारी दुकानेच बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून आल्याने शहरातील सर्व मेडिकल सेवेसह किराणा मालाची दुकाने बंद करण्यात आली हाेती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री प्रशासनाकडून येथील स्थानिक प्रशासनाला आदेश आला आणि शुक्रवारी सकाळपासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती. दुपारनंतर शहरातील सर्व मेडिकल्स किराणा मालाची दुकाने, मच्छीची दुकाने, दुग्धजन्य पदार्थांची दुकाने यासह अत्यावश्यक सेवेत येणारे व्यवसाय बंद करण्यात आले. त्यामुळे राजापूर शहरात कडकडीत बंद पाहायला मिळाला.
राजापुरात गुरुवारी मध्यरात्री कोल्हापुरातून आलेले दूध, दही यासहित भाजीपाला व अन्य नाशवंत पदार्थ यांची विक्री न करता आल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्याच्या विविध भागांतील बाजारपेठाही पूर्ण बंद होत्या.
शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्थानिक नगर परिषद प्रशासनाने शहरात किराणा मालासह भाजीपाला बेकरी, दूध व अन्य दुग्धजन्य पदार्थ, मटण, फळे आदी अत्यावश्यक सेवा घरपाेच देणाऱ्यांचे संपर्क क्रमांक घोषित केले. त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन स्थानिक नगर परिषद प्रशासनाने केले आहे.
......................
व्यावसायिकांना चाचणी आवश्यक
शहरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ज्या व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली असेल किंवा ज्या व्यापाऱ्यांनी कोविड लसीचे डोस घेतले आहेत त्यांनीच दुकाने उघडावीत, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. अनेक व्यावसायिकांनी अशी चाचणी किंवा लस अद्याप घेतली नसल्याने शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद हाेती.