दापोली : शासकीय आदिवासी वसतिगृहात अर्ज सादर केलेल्या सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनींना प्रवेश मिळावा, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे कोकण विभागप्रमुख सुशीलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एप्रिल महिन्यात आदिवासी वसतिगृह प्रवेश प्रक्रियेचे कामकाज पूर्ण होऊन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदिवासी वसतिगृह प्रवेश अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण वसतिगृह प्रवेश यादी अद्यापपर्यंत जाहीर न झाल्याबाबत तसेच विद्यार्थ्यांच्या नोंदणी असलेल्या अधिकृत ई-मेलवरसुध्दा प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचा मेसेज न मिळाल्यामुळे विद्यार्थी हे विविध आदिवासी संघटनांकडे तसेच गृहपालांकडे तक्रारी करत आहेत.
आज वसतिगृह प्रवेशासंदर्भात आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थिनींच्या मनात संभ्रम आहे. भविष्याची काळजी त्यांना पडली आहे. दुर्गम भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूरसारख्या शहरात या कोरोना काळातही शिक्षण घेण्याची हिंमत दाखवतो. त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळत नसेल तर त्याचा विचार न घेता परस्पर विद्यार्थ्यांच्या इच्छेविरूद्ध त्याचा आदिवासी वसतिगृह प्रवेश प्रक्रियेचा अर्ज पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयम् योजनेत वर्ग करण्याच्या प्रयत्नातही बरेच आदिवासी वसतिगृहाचे गृहपाल तयार आहेत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. वसतिगृह मंजूर क्षमता कमी असेल किंवा प्रवेश क्षमता कमी असेल तरी त्यात वाढ करण्यात यावी व आदिवासी विद्यार्थ्यांची भविष्यात होणारी परवड थांबवावी, अशी मागणी सुशीलकुमार पावरा यांनी केली आहे.