चिपळूण : जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनाबाबत चिपळूण तालुक्याचा आढावा घेतला. मान्सून काळात सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना केल्या.चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिव नदीमधील गाळ काढण्याच्या कामाचाही यावेळी त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्गाचे लक्ष्मीकांत जाधव, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजीत रामशे, चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर, तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी चिपळूण उमा घारगे पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की, मागील काही काळात घडलेल्या नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करावा आणि मनुष्य व संपत्तीच्या ‘झीरो लॉस’चा संकल्प करावा. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ‘इन्सिडेंट कमांडर’ असल्याने त्यांना सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन नैसर्गिक आपत्तीत तत्काळ मदत करावी. प्रत्येक महत्त्वाच्या बाबींसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालयात उपस्थित राहावे. प्रत्येक लहानसहान बाबींसाठी ‘मॉकड्रिल’ आयोजित करावे. सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहावे. शाळा किंवा तत्सम निवारागृहे सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
मान्सून काळात सर्व यंत्रणांनी सतर्क राहा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
By संदीप बांद्रे | Published: June 13, 2023 6:59 PM