चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर आता एका-एका कुटुंबाबाबतची माहिती पुढे येऊ लागली आहे. शिवसेनेचे नगरसेवक शशिकांत मोदी यांनी पुराच्या वेढ्यात फसलेल्या अनेकांना बाहेर काढले. अगदी लहान मुले असलेल्या गोखले कुटुंबातील चार सदस्यांना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जीव धोक्यात घालून बाहेर काढले. महापुराने चिपळूणकरांचे सारे काही हिरावून नेले असले तरी माणुसकी मात्र तरली, असेच चित्र दिसले.
आजपर्यंत कधीही पाहिलेला नाही, असा महापूर यावेळी चिपळुणात दीड दिवस मुक्काम ठोकून होता. या पुराने ‘न भुतो’ अशी हानी घडली आहे. या महापुरात हजारो लोक अडकले. एनडीआरएफची मदत पोहोचेपर्यंत रात्र झाली. मात्र, एकूणच प्रसंगात स्थानिक लोक, रत्नागिरीतून धावलेले स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या धाडसामुळे महापुरातही माणुसकी जिवंतच राहिल्याचे दिसले.
ज्यावेळी महापुराचा वेढा कायम होता, तेव्हा म्हणजे शुक्रवारी सकाळी मार्कंडी येथील विवेक गोखले कुटुंबातील चारजण पाण्याने वेढलेले असल्याचे नगरसेवक शशिकांत मोदी यांच्या लक्षात आले. गोखले यांनी कुकरच्या सहाय्याने सिमेंटचा पत्रा फोडून त्यातून मान बाहेर काढून मदतीसाठी पुकारा केला. ते समजल्यानंतर मोदी यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत त्या सर्वांना बाहेर काढले. त्यात एका लहान मुलाचाही समावेश होता.
पक्षीय पदाधिकाऱ्यांसोबतच सर्वसामान्य माणसेही मदतीसाठी खूप धावाधाव करत होती. विघ्नहर्ता या संस्थेनेही पुराच्या पाण्यातून वाट काढत अनेकांना जेवण पोहोचवले.