राजापूर : लाचलुचपत खात्याच्या कारवाईमुळे चर्चेत आलेला राजापूर पंचायत समितीतील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग शहरानजीकच्या कोंढेतड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय पेयजल योजनेतील भ्रष्टाचारामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पेयजल योजनेतून सुमारे ३६ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे काम अपुरे व निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. असे असतानाही या कामाच्या बिलापोटी ७० टक्के रक्कम ठेकेदारास अदा करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केली आहे.
गुरव यांनी कोंढेतड ग्रामस्थांसमवेत गटविकास अधिकारी सागर पाटील यांची भेट घेऊन जाब विचारला. कोंढेतड ग्रामपंचायतीच्या झालेल्या गैरकारभाराची चौकशी होऊन संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोंढेतड कुवळेकरवाडीसाठी मंजूर झालेल्या या नळपाणी योजनेची काम पूर्ण करण्याची मुदत २०१९ मध्ये संपूनही ही योजना अद्यापही पूर्ण झालेली नाही. अपूर्ण आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झालेले असतानाही ७० टक्के कामाचे पैसे मात्र अदा करण्यात आले आहेत.
या योजनेतून सुमारे २५ हजार लिटर पाण्याची टाकी उभारण्यात येणार होती. गतवर्षी या टाकीचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी नदीतील मातीमिश्रित वाळू वापरण्यात आली होती. ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्यावर गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन उपअभियंता विजय मेंगे, भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, तत्कालीन उपसरपंच अरविंद लांजेकर व ठेकेदार घोरपडे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर ही टाकी नव्याने बांधण्याचे आदेश देण्यात आले? होते. मात्र त्याचे पालन न करता तसेच टाकीचे काम पूर्ण करण्यात येऊन ७० टक्के बिल अदा कसे करण्यात आले? असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला आहे.
याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सहायक अभियंता पाटील, कनिष्ठ अभियंता मेस्त्री, महेंद्र शिंदे यांच्यासह अन्य कोंढेतड ग्रामस्थ उपस्थित होते.