रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील वाटूळ येथे प्रस्तावित असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवरुन सुरू झालेले आरोप प्रत्यारोप अजूनही थांबलेले नाहीत. आपल्या एका डरकाळीमुळे काम झाल्याचे विधान आमदार राजन साळवी यांनी केले होते. आता त्या विधानाला पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. कुणाच्याही डरकाळीला मी घाबरत नाही, असे सांगतानाच नुसते बॅनर लावून विकास होत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.गुरुवारी राजापूर दौ-यावर असलेल्या मंत्री सामंत यांच्याहस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला. त्यानंतर बोलताना त्यांनी विरोधकांना चांगलेच चचिमटे काढले. राजापूर विधानसभा मतदार संघात नवीन फॅशन सुरु झाली आहे. आम्ही विकासकामे करायची, जनतेचे प्रश्न सोडवायचे आणि विरोधकांनी बॅनर लावून श्रेय घयायचे. पण नुसते बॅनर लावून विकास होत नाही, असे मंत्री सामंत म्हणाले.राजापूरच्या मतदार संघाला ऐतिहासिक वारसा आहे ते जपण्याचे काम भविष्यात याच मतदार संघात होणार होईल, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभा निवडणुकांकडेच इशारा केला आहे. वाटुळ येथे होऊ घातलेल्या सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सिंधूरत्न समितीचे महाराष्ट्राचे सदस्य किरण सामंत यांनी पाठपुरावा केला. मात्र डरकाळी फोडून श्रेय घेण्याचे काम येथील काही लोकप्रतिनिधी करत आहेत. अशा डरकाळीला उदय सामंत घाबरत नाही आणि कोणाच्या टिकेला बोलून उत्तर देत नाही. मी जनतेची सेवा करून त्यांची कामे करून विरोधकांना उत्तर देतो.
Ratnagiri: कुणाच्याही डरकाळीला घाबरत नाही; राजन साळवींच्या विधानावर मंत्री उदय सामंतांचे प्रत्त्युत्तर
By मनोज मुळ्ये | Published: July 18, 2024 6:26 PM