रत्नागिरी : कोरोना महामारीचे गांभीर्य ओळखून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तिन्ही जिल्ह्यांसाठी १५० ऑक्सिजन काँसन्ट्रेटर मशीन दिली. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्याला ५० ऑक्सिजन मशीन मिळाली आहेत. एवढेच नाही; तर ५० रेमडेसिविर इंजेक्शनही दिली आहेत. आरोप - प्रत्यारोप करीत न बसता शिवसेनेने संघटना म्हणून काम करून दाखविले आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते.
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये या महामारीच्या काळात शिवसेना संघटना म्हणून काही तरी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात १५० ऑक्सिजन काँसन्ट्रेटर मशीन देण्यात आल्या.
राज्यासह जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट कायम आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा राबत आहेत. तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविली जात आहे. ही लाट थोपविण्याच्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे सामंत यांनी सांगितले.
कोरोनासारख्या महामारीत आम्ही बोलत न बसता शिवसेना संघटना म्हणून काम करून दाखविले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेकडून कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी ५० याप्रमाणे त्याचे वाटप केले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात ते रत्नागिरी जिल्ह्याला देण्यात आले. जिल्ह्याला मिळालेल्या ५० ऑक्सिजन मशीनपैकी खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर आणि मंडणगड या तालुक्यांना प्रत्येकी दहा असे वितरित करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यासाठी रेमडेसिविरची ५० इंजेक्शन्स
जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासू नये, यासाठीही प्रयत्नशील आहे. आता जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन्स कमी प्रमाणात आहेत. म्हणून शिवसेेना संघटनेकडून ५० रेमडेसिविर इंजेक्शन्स देण्यात आली आहेत. त्याचे समान वाटप करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम पुन्हा राबवा
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम महाराष्ट्रात राबवा : सामंत
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी, जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी‘ अशा नावाने राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत २ लाख ८६ हजार लोकांची तपासणी केली आहे. त्यात १३६ कोरोनाबाधित सापडले आहेत. या मोहिमेचा चांगला फायदा होत असून महाराष्ट्रात पुन्हा ही योजना राबवावी, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे यावेळी मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.