राजापूर : नगर परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कुठल्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर राजापूरमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजापूर नगर परिषदेत असलेली सत्ता टिकवण्याची जबाबदारी असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी होईल, अशी आता स्थिती दिसत असली तरी दुसरीकडे शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांतील संघर्ष मिटेल व युती होईल, याबाबतही अंदाजे वर्तविणे मुश्कील झाले आहे. राज्यात ज्या नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये राजापूरचाही समावेश आहे. ब्रिटिशकालीन नगर परिषद असा उल्लेख असलेल्या या नगर परिषदेमध्ये एकूण सतरा नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. यापूर्वी एकूण चार प्रभागांतून हे नगरसेवक निवडून दिले जात होते. मात्र, शासनाच्या नवीन धोरणानुसार आता एका प्रभागातून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. सात प्रभागांतून प्रत्येकी दोन असे चौदा आणि एका प्रभागातून तीन सदस्य अशी एकूण सतरा सदस्य संख्या असेल. राजापूर नगर परिषदेवर सध्या काँगे्रस - राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामध्ये काँग्रेसचे दहा व राष्ट्रवादीचा एक असे अकरा सदस्य आहेत. राष्ट्रवादीचा एक सदस्य यापूर्वी सेनेत गेल्यामुळे सेनेची सदस्य संख्या एकने वाढून चार झाली आहे, तर भाजपची संख्या दोन आहे. स्वीकृत सदस्यांपैकी प्रत्येकी एक सदस्य काँग्रेस व भाजपचा आहे. काही दिवसांपूर्वी निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले असले, तरी नगराध्यक्षपदाचे आरक्षणाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून होणार असल्याने अनेक इच्छुक नगराध्यक्षपद केंद्रस्थानी मानून वाटचाल करत आहेत. एकदा का नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले की, मगच खऱ्या अर्थाने राजकीय धुळवडीला सुरुवात होणार आहे. राजापूरची निवडणूक यावेळी तिरंगी होईल, अशी शक्यता आहे. दोन काँग्रेसदरम्यान आघाडी होईल, अशा दृष्टिने हालचाली सुरू आहेत. काँग्रेसच्या तुलनेत राजापुरात राष्ट्रवादी फारच कमजोर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ आघाडी करताना फारसे ताणून धरणार नाहीत, असे चित्र सध्या आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार बाळ माने यांनी जिल्ह्यात शिवसेनेशी युती करण्यास आधीच ठाम विरोध दर्शविला आहे. राजापुरात तर त्यांनी या विधानाचा वारंवार उच्चार करताना आपल्याला युती का नको, त्याची कारणेही दिली आहेत. शिवसेनेकडून मात्र अशी टोकाची भाषा वापरण्यात आलेली नाही. आमदार राजन साळवी यांनी तर युतीसाठी भाजपकडे मैत्रीचा हात पुढे करत असल्याचे जाहीर केले होते. युतीला विरोध केल्याबद्दल राजापूर दौऱ्यावर येऊन गेलेले खासदार विनायक राऊत यांनी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून युतीचा प्रस्ताव आल्यास आपण त्याचा विचार करू, असे विधानही केले होते. (प्रतिनिधी) युतीसाठी राजी नाही : आघाडीकडून निवडणुकीसाठी ‘फिल्डिंग’ फेब्रुवारी, मार्चच्या दरम्यान जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकाही होणार आहेत. जिल्ह्यात दोन काँग्रेसच्यावतीने आघाडी करून जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली जाणार आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष यावेळी युतीसाठी राजी नसल्याचे दिसत आहे. खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना - भाजप यांच्यात युती होणार का? याबाबत कानोसा घेतला असता, दोन्ही पक्षांना युती नको असल्याचे दिसून आले. त्यामुळे सेना - भाजप युती व दोन काँग्रेसची आघाडी होणार किंवा कसे याचे उत्तर आगामी काळातच मिळणार आहे.
युती, आघाडीबाबत साशंकता
By admin | Published: October 01, 2016 11:44 PM