खेड : खेड नगर पालिकेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर असलेली शिवसेना - भाजप युती तोडावी लागली. आम्हाला अपेक्षित जागा न मिळाल्याने युती तुटल्याची माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते मधुकर चव्हाण यांनी दिली.उमेदवारांना प्रेरणा देणे आणि खेड भाजपच्या निवडणूक तयारीची माहिती घेण्यासाठी चव्हाण बुधवारी खेडमध्ये आले होते. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, गेली २० वर्षे येथील शिवसेनेशी युती असतानाही खेड भाजपला स्थानिक पातळीवर महत्व दिले गेले नाही. २० वर्षात नगर पालिका निवडणुकीत भाजपला २पेक्षा अधिक जागा कधीच दिल्या नाहीत. शिवसेना नेते रामदास कदम हेच याबाबत निर्णय घेत असत. २० वर्षे वारंवार एक किंवा दोन उमेदवार लढत देऊन निवडून येत असत. मात्र, खेड भाजपच्या दृष्टीने १७ सदस्य असलेल्या या निवडणुकीत ही संख्या नगण्य होती, अशी किती वर्षे काढायची. याचा गांभीर्याने विचार करुन या निवडणुकीत युती करायची असेल तर भाजपला समाधानकारक जागा मिळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, यावेळीही रामदास कदम यांनी दोनपेक्षा जास्त जागा देण्यास नकार दिल्याने स्थानिक पातळीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी युतीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितले.चव्हाण पुढे म्हणाले की, खेड पालिकेत आमचे सर्व उमेदवार चांगली लढत देऊन विजयी होतील, तसेच नगराध्यक्षही भाजपचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, याअगोदर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेने खेड नगर पालिकेमध्ये सत्ता उपभोगली. शिवसेनेने दीर्घ काळ सत्ता उपभोगली. मात्र, आजतागायत शहरातील नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आवश्यक त्या मूलभूत सोयीसुविधा कोणीही देऊ शकले नाहीत. भाजप सत्तेवर आल्यानंतर या सुविधा पुरविणार आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे खेड शहरासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे ते म्हणाले.गेली ५ वर्षे मनसेची सत्ता होती. मात्र, खेड शहराला त्यांनी कहीही दिले नाही. वास्तविक राज ठाकरे यांनी या पालिकेवर लक्ष केंद्रीत करायला हवे होते, त्यांना संधी होती. राज्यात एकहाती सत्ता असणाऱ्या एकमेव खेड पालिकेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. येथील नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या उत्कर्षाच्या योजना त्यांनी राबवणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने शहर अविकसित राहिल्याचा आरोप मधुकर चव्हाण यांनी केला. अशा स्थितीत भाजपचा नगराध्यक्ष असेल तर खेड शहर विकासाचा वेग वाढेल. नागरिकांचे मूलभूत प्रश्न घेऊन ही निवडणूक भाजप लढवत आहे, त्यामुळे यश आमचेच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.केंद्र सरकारने चलनी नोटा बंद केल्याने सामान्यांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत त्यांनी कबुलीही दिली. मात्र, हा धोरणात्मक निर्णय असून, यामुळे काळा पैसा बाहेर काढण्याचे प्रयत्न आहेत. जनतेने सरकारच्या पाठीशी उभे राहाणे, गरजेचे असल्याचे ते म्हणाले.केंद्र सरकारच्या या निर्णयाचे राजकीय पक्षांनी भांडवल केले नाही, असे सांगत चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी पैसे बदलण्यासाठी रांगेत उभे राहण्याची नौटंकी केली, असे ते म्हणाले. केंद्राने काळा पैसा पांढरा करण्याची मुदत दिली होती. आता ही मुदत संपली आहे. या निर्णयाची काहींना पोटदुखी आहे. जेवढे ब्रिटिशांनी लुटले नाही, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक देशातील काही मंडळींनीच देश लुटण्याचे काम केले आहे. सामान्य माणसाला याची कल्पना आहे. मात्र, राजकीय पक्षांनी याचे भांडवल केले असल्याचा आरोप केला.यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू रेडीज, तालुकाध्यक्ष विनोद चाळके, शहर अध्यक्ष भूषण काणे, माजी तालुका अध्यक्ष संजय बुटाला, कोकण ग्लोबल प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, तालुका सरचिटणीस नागेश धाडवे, वैजेश सागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जागावाटप फिस्कटल्यानेच खेडमध्ये युती तुटली
By admin | Published: November 16, 2016 10:22 PM