खेड : तालुक्यातील आणि खाडीपट्ट्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंंद्राला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावतीने आणि आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून शिवसेना, युवा सेनेच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप करण्यात आले.
देवधे कोविड सेंटरला उपकरणांची भेट
लांजा : लांजा तालुका युवक राष्ट्रवादीतर्फे देवधे कोविड केअर सेंटरला पिण्याचे पाणी गरम करण्यासह अन्य उपकरणांची भेट देण्यात आली. देवधे कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बाधित रुग्णांना पिण्याचे पाणी गरम करण्याची आवश्यकता असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसला मिळाली होती.
कोरोनाला गावाबाहेर रोखण्यात यश
देवरुख : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव गावाबाहेर रोखण्यात संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे ग्रामपंचायतीला यश आले आहे. मी घरातच राहणार, या संकल्पनेतून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करून ग्रामपंचायतीचे क्षेत्र कोरोनामुक्त करण्यात चोरवणे ग्रामस्थ यशस्वी बनले आहेत.
पाण्याचा निचरा होणार कसा...
चिपळूण : शहरातील रावतळे येथे महामार्गालगत तलाठी यांच्या दुकानाजवळ मोरीचे काम आता सुरू करण्यात आले आहे. या मोरीमुळे पावसाळ्यात रावतळे भागात पाणी भरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण महामार्गाच्या गटाराला जाेडून हे मोरीचे पाईप टाकण्यात येत आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होणार कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
तुळसुंदेत रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात
राजापूर : आमदार राजन साळवी यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या तुळसुंदे मुख्य उताराच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. हे काम शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजू साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मच्छिमार नेते परशुराम डोर्लेकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.
घरांच्या अच्छादनास प्लास्टिकसाठी धावपळ
रत्नागिरी : डोक्यावर आलेला पावसाळा यासाठी घराच्या छपरावर टाकण्यासाठी प्लास्टिकची आवश्यकता असते. मात्र, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनने संपूर्ण बाजारपेठेतील प्लास्टिक विक्रीची दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे प्लास्टिक आणणार कुठून? असा प्रश्न लोकांना सतावत आहे. या प्लास्टिकसाठी धावपळ सुरू आहे.
अँटिजन चाचणीसाठी टाळाटाळ
चिपळूण : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने शहर परिसरात मोबाईल व्हॅनद्वारे ठिकठिकाणी अँटिजन चाचणी केली जात आहे. मात्र, या अँटिजन चाचणीकडे काही रिक्षा व्यावसायिक दुर्लक्ष करत आहेत. परिसरात मोबाईल व्हॅन येताच ते पळ काढत आहेत.
पाणीटंचाईची तीव्रता वाढली
राजापूर : तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तरीही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई उद्भवते. ग्रामीण भागात वनराई बंधारे बांधले आहेत. मात्र, वाढत्या उष्णतेने नदीचे पाणीही कमी झाले आहे. तसेच पाण्याचे स्त्रोतही कमी होत आहेत. त्यामुळे टंचाईचा दाह दिवसेंदिवस तालुक्यात वाढतच आहे.
तालुकावासीयांची गैरसोय
मंडणगड : भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. या रुग्णालयातील ओपीडीसह येथे चालणारे अन्य आजारांवरील सर्व प्रकारचे उपचार तातडीने बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे इतर रुग्णांची गैरसोय होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाने ठिकठिकाणी चिखल
रत्नागिरी : शहर परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी व अन्य कामांसाठी रस्त्यांवर खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर माती पसरलेली होती. वादळामुळे कोसळलेल्या पावसाने या मातीचा चिखल बनला आहे. त्यामुळे नागरिक हैराण बनले आहेत.
बाणकोट परिसरात तपासणी
मंडणगड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहीम हाती घेतली आहे. गाव, वाड्या आणि वस्त्यांवर ही मोहीम राबविली जात आहे. ही माेहीम मंडणगड तालुक्याचे टोक असलेल्या बाणकोट गावातही करण्यात आली. त्याला येथील रहिवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.