टेंभ्ये :
जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या सुटीमध्ये मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी रत्नागिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे करण्यात आली असल्याचे अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.
गेली दोन वर्षांपासून शिक्षक जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कोविड-१९ संदर्भातील कामकाजामध्ये व्यस्त असल्याने त्यांना मुख्यालय सोडता आलेले नाही. त्यामुळे किमान यावर्षी तरी शिक्षकांना आपल्या गावी जाण्याची सशर्त परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मार्च २०२० पासून कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कोविडविषयक सेवेत कार्यरत आहेत. यामध्ये जिल्ह्यात विलगीकरण कक्ष, पोलीस मित्र, रेल्वे स्टेशन व बसस्थानक तपासणी नाके, चेकपोस्ट, लसीकरण केंद्र, कोविड तपासणी केंद्र, ग्रामीण रुग्णालय व शासकीय कार्यालयातील स्वागत कक्षात कामकाज, गावात कोविड सर्वेक्षण या ठिकाणी प्रशासनाच्या आदेशानुसार सेवा बजावत आहेत.
राज्यातील शाळांना १ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यालय सोडताना व मुख्यालयी परत येताना कोविडसंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटीवर व कोविडसंदर्भातील देण्यात आलेली सर्व जबाबदारी पूर्ण करण्याच्या अटीवर मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे तंतोतंत पालन करण्याच्या अटीवर मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अध्यापक संघातर्फे करण्यात आल्याचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.