महामार्ग बंद असल्यामुळे भाज्यांच्या उपलब्धतेवर परिणाम, दरवाढीमुळे ग्राहक हैराण
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : संततधार पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुराचे पाणी ओसरण्याचे प्रमाण संथ आहे. रत्नागिरी - मुंबई, कोल्हापूर, सातारा हे मार्ग अद्याप बंद असल्याने भाजीपाला, दूध, अंडी यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उपलब्ध भाज्यांचे दर मात्र कडाडले असून, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. गेले वर्षभर डाळी, कडधान्यांच्या दरातही सातत्याने वाढ सुरू आहे. लवकरच श्रावण सुरू होणार असून, सणासुदीचे दिवस सुरू होत असतानाही महागाईला सामोरे जावे लागत आहे.
भाज्यांचे दर शंभरच्या घरात पोहोचले असून, ठराविक भाज्यांनी तर शंभरीही ओलांडली आहे. डाळींच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. दरवाढीसाठी इंधन दरवाढीचे कारण पुढे केले जात आहे. डाळी, कडधान्य, भाज्यांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा ‘डाळभात’ही महागला आहे.
सध्या पुराच्या कारणामुळे भाज्या उपलब्ध होत नसल्या, तरी भाज्यांच्या दरातील चढ-उतार सातत्याने सुरूच आहे. स्थानिक गावठी भाज्यांची उपलब्धता अल्प प्रमाणात असल्याने परजिल्ह्यातून विक्रीसाठी येणाऱ्या भाज्यांवर अवलंबून राहावे लागते.
इंधन दरवाढीचा परिणाम
n इंधन दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने वाहतूक खर्चातील वाढीमुळे दरात वाढ होत आहे.
n जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून,भाजीपाला काही प्रमाणात पिकतो. डाळींचे उत्पादन होत नाही.
n मुंबई, कोल्हापूर येथून जिल्ह्यात डाळी, कडधान्य विक्रीसाठी येत असतात.
n हवामानातील बदलामुळे पिकावर परिणाम होत असून, दिवसेंदिवस उत्पादन घटत आहे. त्यामुळे दरवाढीचा सामना करावा लागतो.
पावसामुळे उत्पादनावर परिणाम
मे महिन्यात झालेले ‘ताैक्ते’ वादळ व नंतर झालेली अतिवृष्टी, त्यानंतर ‘ब्रेक’ घेऊन पुन्हा सुरू झालेला मुसळधार पाऊस यामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात पालेभाज्या, फळभाज्यांचे उत्पादन घेण्यात येत असले तरी बहुतांश भाज्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून विक्रीसाठी येतात. मात्र, पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून, पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवडाभरात तर लगतच्या सर्व जिल्ह्यांतून पूरजन्य स्थिती उद्भवल्याने मार्ग बंद असून, आवक थांबल्याने दरात कमालीची वाढ झाली आहे
स्थानिक भाज्या बारमाही नाहीत, त्यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या भाज्यांवरच अवलंबून राहावे लागते. इंधन दरवाढीचे कारण सातत्याने सांगितले जात असले, तरी भाज्यांच्या दरवाढीवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. भाज्यांसह डाळींच्या किमतीही कडाडल्याने काय खावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- स्नेहा शिंदे, गृहिणी.
पाऊस जास्त झाला अथवा कमी झाला तरी प्रत्येकवेळी उत्पादनातील घट सांगून ग्राहकांची लूट सुरू आहे. दैनंदिन आहारातील भाज्या, डाळींच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना याचा भुर्दंड बसत आहे. दरवाढ कोणत्या निकषावर केली, याचे कारण मात्र सांगता येत नाही.
- ऋणाली रामाणे, गृहिणी.
लगतच्या जिल्ह्यातील भाजीपाला विक्रीसाठी येत असताना, तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिलाव होऊनच विक्रीसाठी येतो. शहरापासून अवघ्या काही अंतरावर लिलावावेळचे दर व प्रत्यक्ष विक्रीदर यामध्ये कमालीचा फरक जाणवत आहे. यातून सर्वसामान्यांची फरपट होत आहे.
- दिशा सोलकर, गृहिणी