राजापूर : तौक्ते वादळानंतर विद्युत पुरवठा दोन दिवस खंडित झाल्याने त्याचा जोरदार फटका रायपाटणमधील कोविड सेंटरला बसला़ विजेची पर्यायी व्यवस्था नसल्याने तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांवर उपचार करताना संबंधित आरोग्य यंत्रणेला नाकीनऊ आले तर कोविड सेंटरमध्ये पाणी संपल्याने रुग्णांचीही परवड झाली़ दरम्यान रायपाटण कोविड सेंटरमधील पुरवठा खंडित असताना तेथे विजेची पर्यायी व्यवस्था न झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वादळामुळे ओणीमधील सबस्टेशनमधील तांत्रिक बिघाडामुळे तालुक्याचा पूर्व परिसर अंधाराखाली होता़ तालुक्याच्या पूर्व परिसरात रायपाटण येथील खापणे महाविद्यालयाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात तालुक्याचे कोविड सेंटर सुरु आहे़ सध्या तेथे शंभरच्या आसपास कोविडचे पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत़ अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांवर उपचार करताना संबंधित आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली़ कोविड सेंटरला जनरेटरची पर्यायी व्यवस्था नसल्याने रुग्णांवर उपचार करताना अनंत अडचणी आल्या़ विद्युत पुरवठा बंद असल्याने कोविड सेंटरमधील पाणी पुरवठाही बंद पडल्याने रुग्णांना पिण्याच्या पाण्यापासून विविध वापरासाठी पाणीच उपलब्ध नव्हते़ त्यामुळे रुग्णांच्या समस्येत आणखीनच भर पडली़ सोमवारी दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत सुरु झाला नव्हता़ शिवाय विद्युत व्यवस्थेसाठी पर्यायी व्यवस्थाही रायपाटण सेंटरला उपलब्ध झाली नव्हती़
गेले वर्षभर तालुक्यासाठी असलेले रायपाटणचे कोविड सेंटर महत्त्वाची भूमिका बजावत असताना विद्युत व्यवस्थेला पर्यायी व्यवस्था न दिल्याने समस्यांचा सामना रुग्णांना करावा लागला आहे़ तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा रायपाटण कोविड सेंटरला तत्काळ विजेची पर्यायी व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.