रत्नागिरी : कोरोना आणि त्यामुळे बंद असलेल्या विमानसेवेमुळे घटलेली आंबा निर्यात यंदा पूर्ववत झाली असून, यावर्षी प्रथमच रत्नागिरी हापूस इंग्लंडला निर्यात करण्यात आला आहे. बारामती येथील पॅक हाऊसमध्ये साडेतीन हजार किलो आंब्यावर प्रक्रिया करून आंबा इंग्लंडला पाठविण्यात आला.हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादन कमी आहे. सुरुवातीचा तयार झालेला आंबा मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. वाशी (नवी मुंबई) येथून आखाती प्रदेशात आंब्याची निर्यात सुरू आहे. अन्य देशांतूनही हापूससाठी मागणी वाढू लागली आहे. आखाती प्रदेशानंतर रत्नागिरी हापूस इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. इंग्लंडमध्ये आंबा प्रथमच पाठविण्यात आला आहे. या पहिल्या आंब्याला भारतीय चलनानुसार प्रति डझनसाठी १८०० ते १९०० रुपये दर मिळाला आहे. इंग्लंडमध्ये अनेक भारतीय शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी आहेत. त्यांची मागणी लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या भाज्या भारतातून येतात. विमानातून भाजी निर्यात होते. भाजीबरोबर हापूसचे बॉक्स विक्रीसाठी आले आहेत. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भविष्यात हापूससाठी मागणी वाढेल.- तेजस भोसले, व्यावसायिक, इंग्लंड
कोकणचा राजा इंग्लंडमध्ये; डझनसाठी १८०० ते १९०० रुपये दर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 10:18 AM