चिपळूण : तालुक्याच्या टोकाला आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या कोळकेवाडी गावाला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. उंचावर वसलेल्या धनगरवाडीतील ग्रामस्थांना सर्वात जास्त वादळी तडाखा बसला आहे. मुळात परिस्थिती बेताची. त्यातच घरांची पुन्हा दुरुस्ती करावी लागणार असल्याने धनगरवाडी ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या चक्रीवादळात कोळकेवाडीतील ४० शेतकऱ्यांचे सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा संपूर्ण तालुक्याला तडाखा बसला आहे. ग्रामीण भागातील अनेक गावातील घरे, गोठे, शासकीय इमारतींचे नुकसान झालेले आहे. घरावरील पत्रे, कौले, उडून गेलीत. फळबांगाचेही तितकेच नुकसान झालेले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आल्यानंतर, ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायकांनी नुकसानग्रस्तांचे पंचनामे सुरू केले आहेत. तालुक्याच्या टोकाला वसलेल्या कोळकेवाडीला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान हे धनगरवाडीतील ग्रामस्थांचे झाले. धनगरवाडीची वस्ती उंचावर असल्याने येथे वाऱ्याचा वेग जास्तच होता. घरावरील कौले, पत्रे उडून गेले. त्यानंतर त्वरित पावसाला सुरुवात झाल्याने काहींच्या घरातील धान्य भिजले आहे.
मुळात धनगरवाडीतील ग्रामस्थांची परिस्थिती बेताची. त्यातच घरांचे नुकसान झाले. आता घरांची दुरूस्ती करायची कशी यांची चिंता ग्रामस्थांना लागली आहे.
चक्रीवादळात धनगरवाडीला बाधा पोहोचल्यानंतर कोळकेवाडी सरपंच पल्लवी शिंदे, उपसरपंच सचिन मोहिते, तलाठी नर्गिस नायकवडी, ग्रामसेवक मंगेश पिंगळे, पोलीस पाटील बच्चाजी शिंदे, सदस्य श्रीकांत निगडे, सुनीता वरक यानी वाडीत धाव घेत पंचनामे केले. परिस्थितीची पाहणी करीत सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना धीर देण्याचा प्रयत्न केला. गावातील ३८ जणांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. याशिवाय बौद्धवाडी, तांबडवाडी स्मशानशेड पत्रे, व सार्वजनिक शौचालयाचे पत्रे उडून फुटून गेले आहेत. गावातील श्रमिक सहयोग संस्थेचेही पत्रे व कौले उडून गेल्याने नुकसान झाले आहे.