रत्नागिरी : दिवाळी सणानिमित्त दुकाने सजली असून, बाजारपेठेमध्ये पावसामुळे ग्राहकांची फारशी गर्दी नाही. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने, फटाके, मिठाई, फराळ विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीची खरेदी भाऊबीजेपर्यंत ग्राहक करीत असल्याने बाजारपेठेत शनिवारपासून गर्दी होण्याची शक्यता आहे.दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी मानला जातो. पाडवा सोमवारी असल्यामुळे बाजारात खरेदीसाठी अजून दोन ते तीन दिवस गर्दी होण्याची शक्यता आहे. दुसरा शनिवार व रविवार तसेच जोडून सोमवार, मंगळवार दीपावलीची सुट्टी आहे. त्यामुळे आता दोन दिवसात खरेदीसाठी गर्दी होणे अपेक्षित आहे. सध्या वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेत्यांनी खरेदीवर विशेष आॅफर जाहीर केल्या आहेत. त्यामुळे चोखंदळ ग्राहक सध्या जाहिरातीचा माग काढत आहेत.वाहनाचा व्यवसाय सर्वाधिक होतो. त्यापाठोपाठ इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. तयार किंवा रेडिमेड कपडे शिवाय फटाक्यांनादेखील अधिक मागणी आहे. नोकरदार महिलांना फराळाचे पदार्थ करण्यासाठी वेळ नसल्याने रेडिमेड फराळ खरेदी करण्यात येत आहे. फराळाचा एखादं दुसरा जिन्नस घरी तयार केला जातो. अधिक कष्टाने बनवावे लागणारे पदार्थ विकत आणले जात आहेत. विविध कंपन्या दिवाळीच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी ड्रायफ्रूटस् किंवा मिक्स मिठाई खरेदी करत असल्यामुळे दुकानदारांनी वेगळे स्टॉल लावले आहेत.इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा वाहने सणासुदीला घरी आणण्याकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. याशिवाय दागिन्यांची खरेदी करणारे ग्राहकही आहेत. शिवाय सणाचे महत्त्व जाणून वळी किंवा नाणी खरेदी करणारे अधिक आहेत. दिवाळीच्या निमित्ताने विविध इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या, दुचाकी, चारचाकी तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीवर भेटवस्तू जाहीर केल्या असल्याने महिलावर्गाचा त्याकडे अधिक ओढा आहे. शिवाय जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची एक्स्चेंज ऑफर असल्याने ग्राहकांकडून मनपसंत वस्तूंची खरेदी सुरू आहे.ब्रॅण्डेड कंपन्यांच्या वस्तू खरेदीला पसंतीदिवाळीची खरेदी सुलभ व्हावी, यासाठी राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था यांनी तसेच काही वाहनांच्या कंपन्यांनीदेखील ० ते ११ टक्के व्याजदराने अर्थसहाय्य देणे सुरू केले आहे. बॅ्रण्डेड कंपन्यांनी किमतीत घट केल्याने ग्राहकांची ब्रॅण्डेड कंपन्यांच्या वस्तू खरेदीला अधिक पसंती आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये नवीन गॅझेट्स, फ्लॅट स्क्रीनचे टीव्ही, स्मार्टफोन, टॅब यांना मागणी आहे.
आधीच मंदी अन् पावसालाही जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 1:41 PM
आता दोन दिवसात खरेदीसाठी गर्दी होणे अपेक्षित आहे. सध्या वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेत्यांनी खरेदीवर विशेष आॅफर जाहीर केल्या आहेत. त्यामुळे चोखंदळ ग्राहक सध्या जाहिरातीचा माग काढत आहेत.
ठळक मुद्दे दिवाळीसाठी होते भाऊबीजेपर्यंत कपडे, विविध वस्तूंची खरेदी.शनिवार, रविवारी बाजारपेठा ग्राहकांनी फुलण्याची शक्यता.दिवाळी निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून विविध योजना.