तणनाशक औषधांचा वापर प्रथम गेल्या शतकाचे अखेरीस झाला. त्यावेळी खाण्यातील मिठाचा तणनाशक म्हणून वापर करण्यात आला. गेल्या वीस वर्षांत शास्त्रज्ञांनी याबाबतीत सखोल अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणजे सध्या अनेक प्रकारची नवीन व प्रभावी रासायनिक तणनाशके बाजारात मिळू लागली आहेत. वापरण्यास सहजसुलभ व अत्यंत प्रभावी तसेच कमी खर्चाची आहेत. मजुरांचा तुटवडा असेल, अशावेळी तणनाशकांचा वापर करणे फायद्याचे ठरते. भातपिकात प्रामुख्याने पाखड, धूर, बार्डी, लव्हाळा, मरकट इत्यादी गवतवर्गीय तणे व कडूचिंच, रेशीमकाटा, कवळा, ओसाडी इत्यादी रूंद पानांची तणे आढळतात. पुनर्लागवड भातलागवडीमध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी असतो आणि पेरभात/टोकण केलेल्या भातामध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त असतो. पुनर्लागवड भात पध्दती अंतर्गत तणांमुळे २५ ते ४० टक्के उत्पादन घटते व पेरभात किंवा टोकण पध्दतीने घेतलेल्या भाताचे तणामुळे ६० ते ८० टक्केपर्यंत उत्पादन घटते.
पुनर्लागवड पध्दतीमुळे पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत चिखलणीमुळे तण नियंत्रण होते. लागवडीपूर्वी शेत समपातळीत आणून पुनर्लागवडीनंतर पीक प्रस्थापित होईपर्यत पाण्याची पातळी दोन ते अडीच सेंटीमीटर ठेवावी. नंतर वाढवून कमाल फुटवा अवस्थेपर्यंत ५ सेंटीमीटर असावी. तणाची उगवण यामुळे टाळली जाते, उत्पादनावर परिणाम होत नाही.
काेळप्यांचा वापर
भातखाचरात आदर्शवत पाणीपातळी सातत्यपूर्वक ठेवली जाऊ शकत नाही, तेथे पुनर्लागवडीनंतर १५, ३०, ४५ दिवसांनी जपानी किंवा कोनो हातकोळप्यांचा आंतरमशागतीसाठी वापर केल्यास किमान खर्चात तणांचा बंदोबस्त होतो. अशी तणे गाडल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून अन्नद्रव्यांची अल्प प्रमाणात तरी भर पडते. शिवाय जमिनीत हवा खेळती राहते, फुटवा निर्मितीला चालना मिळते. शेवटच्या कोळपणीनंतर तणांचे नियंत्रण उपटून करता येते.
निचराक्षम शेतात वापर
अतिपर्जन्यमानामुळे पुनर्लागवड करावयाच्या बहुतांशी क्षेत्रात पाणी साठत असल्याने उगवणपूर्व तणनाशकांचा वापर फक्त निचराक्षम शेतात करता येतो. अशा क्षेत्रात पुनर्लागवड झाल्यानंतर सहा दिवसांनी पाण्याचा निचरा करून ऑयक्झॅडायारजील, पेटीलॅक्लोर, फेनाॅक्झाॅप्राप पी इथेल, पायराझोसल्फ्युराॅन, ब्युटाक्लोर, सायलोफाॅप ब्युटाईल याप्रकारची तणनाशके वापरता येतात, मात्र त्यासाठी मार्गदर्शन गरजेचे आहे.