गुहागर : तालुक्यातील गेल्या महिनाभरात दररोज वाढणारी कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी आली आहे. ही तालुकावासीयांसाठी दिलासादायक गोष्ट असली तरी मृत्यूचे प्रमाण अद्याप कायम आहे. सरासरी दिवसागणिक एक रुग्ण दगावत असल्याने तालुकावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
एप्रिल महिन्यामध्ये तब्बल १ हजार ४४४ रुग्णांची भर पडली. ही वाढ सर्वाधिक होती, तर एप्रिल महिन्यात तब्बल ३० जणांच्या मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. १ मेपासूनची आकडेवारी पाहता गेल्या बारा दिवसांत ४०७ रुग्णांची भर पडली आहे. तर तब्बल १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये १ मे रोजी ५६, २ मे ५७, ३ मे - ८, ४ मे - ४३, ५ मे - ४३, ६ मे - २७, ७ मे - ५४, ८ मे - २६, ९ मे - ४४, १० मे - ०, ११ मे - २४, १२ मे - २५ अशी आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. मागील महिन्याची आकडेवारी पाहता दिवसाला सरासरी ४९ रुग्ण सापडले आहेत. ८ मेपासून गेल्या चार दिवसांची आकडेवारी पाहता रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. चार दिवसांत फक्त ११९ रुग्णांची नोंद झाली असून, चार दिवसांत सरासरी २५ रुग्ण मिळाले आहेत.
एका बाजूला तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटलेली दिसत आहे. १ मेपासून १२ दिवसांत १४ मृत्यू झाले आहेत. ही बाब तालुकावासीयांची चिंता वाढविणारी ठरत आहे.