Ratnagiri: राजापुरात महाविकास आघाडीत चलबिचल, शिंदेसेनेचे आधीच ठरलेय; उद्धवसेनेच्या जागेवर काँग्रेस आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 05:38 PM2024-10-16T17:38:00+5:302024-10-16T17:39:50+5:30

रत्नागिरी : राजकीय पक्षांनी मित्र बदलल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने जागा वाटपाचा मुद्दा कळीचा झाला आहे. राजापुरात ...

Although the current MLA in Rajapur belongs to Uddhav Sena, the Congress in the Maha Vikas Aghadi is insisting on this seat | Ratnagiri: राजापुरात महाविकास आघाडीत चलबिचल, शिंदेसेनेचे आधीच ठरलेय; उद्धवसेनेच्या जागेवर काँग्रेस आग्रही

Ratnagiri: राजापुरात महाविकास आघाडीत चलबिचल, शिंदेसेनेचे आधीच ठरलेय; उद्धवसेनेच्या जागेवर काँग्रेस आग्रही

रत्नागिरी : राजकीय पक्षांनी मित्र बदलल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने जागा वाटपाचा मुद्दा कळीचा झाला आहे. राजापुरात विद्यमान आमदार उद्धवसेनेचे असले तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस या जागेसाठी अत्यंत आग्रही आहे. दुसऱ्या बाजूला शिंदेसेनेने मात्र एकच उमेदवार निश्चित करून जोरदार प्रचारही सुरू केला आहे.

लोकसभा निवडणुकीत उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना या मतदारसंघात आघाडी मिळाली होती. येथील विद्यमान आमदार राजन साळवी हे उद्धवसेनेचेच आहेत. मात्र, काँग्रेसचा विचार करता या मतदारसंघातच काँग्रेसची ताकद अधिक आहे. त्यामुळे काँग्रेसने सातत्याने या मतदारसंघाची मागणी केली आहे. अजूनही जागावाटप झाले नसल्याने येथे उद्धवसेना लढणार की काँग्रेस, हा प्रश्न बाकी आहे.

आघाडीतील संभ्रम बाकी असतानाच शिंदेसेनेने गेल्या काही महिन्यांत उद्धवसेनेला मोठे खिंडार पाडले आहे. माजी तालुकाप्रमुखांसह अनेक जण शिंदेसेनेत गेले आहेत. त्यामुळे येथील रंगत वाढणार आहे.

शिंदेसेनेची नियोजनबद्ध तयारी, भाजपचे काय?

शिंदेसेनेकडून किरण सामंत यांनी गेल्या काही महिन्यांत या मतदारसंघातील अनेक गावांना भेटी दिल्या आहेत. प्रचाराच्या दृष्टीने त्यांनी नियोजनबद्ध तयारी केली आहे. मात्र, मित्रपक्ष असलेल्या भाजपची येथे काय भूमिका असेल, हे स्पष्ट झालेले नाही. लोकसभा निवडणुकीपासून या मित्रपक्षांमध्ये सुरू झालेले शीतयुद्ध या निवडणुकीत वर येणार का, हा प्रश्न कायम आहे.

काँग्रेसमध्येही दोघे जण इच्छुक

गेली अनेक वर्षे राजापूरचा गड राखून ठेवणाऱ्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्यासह जिल्हाध्यक्ष अविनाश लाड राजापूर मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. काँग्रेसला ही जागा सुटणार का आणि सुटली तर उमेदवारी कोणाला मिळणार, हा प्रश्न आहे.

साळवी समर्थक संभ्रमात

येथील आमदार राजन साळवी यांचे नाव रत्नागिरी मतदारसंघासाठी चर्चेत आले होते. मात्र, आपण हा मतदारसंघ सोडणार नसल्याचे आमदार साळवी यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. आता त्यांची उमेदवारी कायम राहणार की पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय काँग्रेसचे अविनाश लाड यांना उमेदवारी मिळणार, याबाबत आमदार साळवी समर्थकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.

Web Title: Although the current MLA in Rajapur belongs to Uddhav Sena, the Congress in the Maha Vikas Aghadi is insisting on this seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.