रत्नागिरी : जागतिक व्यापारीकरणात सुरु असलेल्या स्पर्धेत ग्राहकांनी विविध प्रलोभनांच्या जाहिरातीला बळी न पडता ग्राहक म्हणून सदैव जागरूक राहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि ग्राहक पंचायत समिती, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंंदे, तहसीलदार मारुती कांबळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राम भिलारे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत, फार्मसी कॉलेज, रत्नागिरीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. अविनाश होसमनी, रत्नागिरी ग्राहक पंचायतीचे सुहास माईणकर आदी मान्यवर उपस्थित होते.शासनाच्या वतीने ग्राहकांच्या संरक्षणासाठी विविध उपाय योजण्यात आले आहेत, याची माहिती ग्राहकांनी घ्यावी. आपली फसवणूक होत असल्यास ग्राहक पंचायतीशी संपर्क साधून आपली तक्रार मांडावी, असे निगुडकर यांनी सांगितले. ‘औषधे घेताना घ्यावयाची काळजी’ या विषयावर फार्मसी कॉलेज, रत्नागिरीचे फार्माकॉलॉजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अविनाश होसमनी यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांप्रमाणेच औषधे खरेदी करायला हवीत. तसेच औषधांचे सेवन करताना डॉक्टरांच्या निर्देशांचे पालन करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत ग्राहकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती भिलारे यांनी दिली. त्यांनी विविध औषधांच्या जाहिरातींचा संदर्भ दिला. या जाहिरातींना बळी न पडता वैद्यकीय व्यावसायिकांच्या सल्ल्यानेच औषधे खरेदी करावीत, असे आवाहनही केले. यावेळी ग्राहक पंचायतीचे कार्यवाह सुहास माईणकर यांनीही विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात निगुडकर यांच्या हस्ते रत्नागिरी केमिस्ट क्लब औषध साक्षरता जनजागृती अभियान पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्राहक पंचायतीचे जिल्ह्यातील पदाधिकारी, ग्राहक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ग्राहक म्हणून सदैव जागरूक रहा : निगुडकर
By admin | Published: December 26, 2014 9:57 PM