देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे खालची घडशीवाडी येथील एका युवकाला लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती संगमेश्वर तालुका आरोग्य कार्यालयाकडून मिळाली आहे. लेप्टो झालेल्या युवकाचे नाव रूपेश संदीप घडशी (वय १६) असे आहे. त्याच्यावर डेरवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंबव पोंक्षे गावात लेप्टोचा रुग्ण सापडल्याने तालुका आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. रूपेश हा अकरावी कला शाखेचा विद्यार्थी आहे. त्याला गेले आठ दिवस ताप येत होता. त्याच्यावर स्थानिक डॉक्टरांकडून उपचार सुरू होेते. मात्र, त्याच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नसल्याने त्याला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अधिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले. याचदरम्यान त्याला दोन दिवसांपूर्वी रक्ताची उलटी झाल्याने त्याची प्रकृ ती अधिकच गंभीर बनली होती. त्यामुळे त्याच्या रक्ताची तपासणी केल्यानंतर लेप्टोस्पायरोसिस आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रूपेशवर डेरवण रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. संगमेश्वर तालुक्यात यावर्षी आढळून आलेला लेप्टोचा हा आठवा रुग्ण आहे. यापूर्वीच्या लेप्टोच्या अन्य रुग्णांची प्रकृती स्थिर झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे. (प्रतिनिधी)
आंबव पोंक्षेत युवकाला लेप्टो
By admin | Published: September 11, 2016 11:16 PM