सागर पाटीलटेंभ्ये: पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारा आंबा घाट सध्या वाहतुकीसाठी जीवघेणा बनत आहे. अतिवृष्टीनंतर आंबा घाटात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दुरुस्तीच्या कामानंतर त्याठिकाणी लोखंडी सळ्या उघड्या झाल्या आहेत. वाहनचालकांसाठी या सळ्या धोकादायक ठरत आहे.रत्नागिरी व कोल्हापूर या दोन महत्त्वपूर्ण जिल्ह्यांना जोडणारा सर्वात सुरक्षित घाट म्हणून आंबा घाटाची ओळख आहे. घाटातून जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या हा घाट जीवघेणा ठरत आहे. रत्नागिरीच्या हद्दीतील पाच ते सात किलोमीटरचा रस्ता सोडता घाटातील सर्व रस्ता पूर्णतः उखडला आहे.अनेक ठिकाणी एक ते दीड फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. दोन वर्षांपूर्वी दरड कोसळलेल्या ठिकाणी अद्यापही दुरुस्ती सुरू आहे. या ठिकाणी बांधकाम खात्याकडून काँक्रीट करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे केवळ एक ते दोन महिन्यांमध्येच या काँक्रीटमधील लोखंडी सळ्या उघड्या झाल्या आहेत.घाटातील वाहतूक धोकादायक ठरत असताना घाटामधून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक अद्यापही सुरूच आहे. घाटाची पूर्ण दुरुस्ती होईपर्यंत अवजड वाहतुकीवर निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे मत प्रवाशांमधून व्यक्त केले जात आहे. बांधकाम खात्याने किमान तात्कळ कार्यवाही करत घाट रस्त्यावरी जीवघेणे खड्डे बुजवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Amba Ghat: आंबा घाट वाहतुकीसाठी बनतोय जीवघेणा, दुरुस्ती तकलादू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:06 PM