मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मूळ गावी दरवर्षी स्थानिक ग्रामस्थांतर्फे जयंती साजरी केली जाते. मात्र, पुढील वर्षीपासून राज्य शासनाच्या माध्यमातून भव्यदिव्य स्वरूपात साजरी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी आंबडवे (ता. मंडणगड) येथे केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते, यावेळी सामंत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित हाेते. मंत्री सामंत पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या आधारावर या देशाचा कारभार चालत आहे. त्यामुळे आंबडवे गावाचा बहुआयामी विकास करणे हे राज्य शासनाचे पहिले कर्तव्य मानतो. त्याकरिता सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासासह येथील शैक्षणिक सोयी-सुविधांच्या विकासाकरिता मी आग्रही राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, घटनाकारांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे, ही बाब जिल्ह्याचा लौकिक वाढविणारी आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे आंबडवे येथे जगभरातील अभ्यासक व पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे स्मारक व पुतळा उभा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. आंबेडकर यांचे अप्रकाशित चरित्र खंडाचे प्रकाशन आंबडवे येथे करणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी आमदार योगेश कदम, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम, माजी सदस्य संतोष गोवळे, अण्णा कदम, माजी सभापती स्नेहल सकपाळ, भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनील सकपाळ यांनी भूषविले, तर नरेंद्र सकपाळ यांनी सूत्रसंचालन केले.
सहाजणांना शासकीय सेवेत घेवू
अर्धवट राहिलेल्या महाविद्यालयाच्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महाविद्यालयासाठी जमीन देणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या यादीनुसार सहाजणांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या वेतनाची समस्याही मार्गी लावली जाणार आहे.
नवा अभ्यासक्रम
राज्यातील विद्यार्थ्यांना भारतीय संविधान कळावे याकरिता राज्य शासन पंधरा तासांचा शिक्षणक्रम अभ्यासक्रमात आणणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लवकरच याबाबतचा शासननिर्णय जाहीर हाेणार आहे.