पाली : गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी पाली विभागातील प्रत्येक गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
सध्या वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झालेला आहे. त्यामुळे शासनाच्या निकषाला बांधील राहून, फिजिकल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करत येथील ग्रामस्तरावरील प्रत्येक विहारात स्थानिक संघाचे अध्यक्ष, सचिव व संपूर्ण कमिटी यांच्या उपस्थितीत जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
पाली विभागातील वेळवंड येथील जेतवन बुद्धविहारात तेथील अध्यक्ष मंगेश मोहिते आणि सचिव मनीष मोहिते यांच्या अधिपत्याखाली बुद्ध पूजापाठ घेण्यात आला. चरवेली येथील जंबुद्वीप बुद्धविहारात तेथील अध्यक्ष प्रकाश गंगाराम सावंत यांच्या उपस्थितीत पूजापाठाचा कार्यक्रम होऊन वाडीतील सर्व ग्रामस्थांनी महामानवाला पुष्पार्पण करून वंदन केले.
कापडगाव येथील बुद्धविहारात राजेंद्र कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती उत्सव साजरा करण्यात आला. खानू येथील संबोधी बुद्धविहारात अध्यक्ष गणपत कांबळे यांच्या अधिपत्याखाली जयंती उत्सव साजरा करण्यात आला. संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ तासाचे विपश्यना ध्यान जुन्या साधकांनी केले. बांबर येथील कपिलवस्तू बुद्धविहारात अध्यक्ष नथुराम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वाडीतील युवकांनी बुद्ध पूजापाठ घेतला.
नाणीज येथील नालंदा बुद्धविहारात अध्यक्ष सुधीर कांबळे आणि सचिव प्रकाश कांबळे व महिला अध्यक्ष उषा अनिल कांबळे यांच्या अधिपत्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. वळके येथील तक्षशिला बुद्धविहारात स्थानिक अध्यक्ष अनंत सावंत यांच्या अधिपत्याखाली जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजापाठ घेऊन प्रतिमांना पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले.