१०-१२ वर्षांपूर्वीपर्यंत अभिषेक नार्वेकर हा तरुण इतर पर्यावरणप्रेमींप्रमाणे आंबोलीत संशोधनासाठी येणाऱ्या संशोधकांसोबत काम करत होता. अशा साऱ्या कामातून संशोधन पातळीवर ‘आंबोली’ खूप पुढे गेली. पण ‘संवर्धन’ विषय मागे पडला. यातला कचरा हा विषय अभिषेकला खटकत होता. तसे आंबोलीच्या स्वच्छतेचे प्रयत्न यापूर्वी ‘मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब’ने केलेले होते. पुन्हा त्याची गरज असल्याचे लक्षात आल्याने अभिषेकने एके दिवशी ठरवलं, ‘आंबोलीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या पोलीस चौकीपासून महादेवगड पॉइंटच्या शेवटपर्यंत आणि रस्त्याच्या दुतर्फा दरीत पडलेलाही सारा कचरा स्वच्छ करायचा’. त्याने आपली ही भूमिका सोशल मीडियावर, ‘PROJECT CLEAN AMBOLI’ पेजवर जाहीर केली. समाजाचा प्रतिसाद मिळू लागला. अभिषेकने आपले सहकारी चेतन नार्वेकर, राकेश देऊलकर, सुजन ओगले आणि कौमुदी नार्वेकर यांच्या सहकार्याने हा कचरा गोळा केला. यासाठी त्यांनी २५ किलो क्षमतेच्या सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या उपयोगात आणल्या. या टीमने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अडीचशेहून अधिक पिशव्या भरल्या होत्या. या पिशव्यातील कचरा सरासरी ५ किलो वजनाचा गृहीत धरला तरी संपूर्ण कचरा साडेबाराशे किलो होत होता. आम्ही आंबोलीत होतो तेव्हा या अभियानाला तीनेक आठवडे झाले होते. इथले स्थानिक सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसल्याने अभिषेकने तीनेक आठवडे कचरा गोळा केल्यावरही प्रशासनापर्यंत याची माहिती पोहोचली नव्हती. कचरा गोळा करायला सुरुवात केल्याच्या पहिल्या दिवशी अभिषेकने चार बॅग कचरा गोळा केला होता. यासाठीची वेळ त्याने सकाळ किंवा संध्याकाळची ठरवली होती. अशाच एके दिवशी त्याने तब्बल १६ बॅग कचरा गोळा केला.
महादेवगड पॉइंट परिसरात खूप कचरा होता. बराच कचरा वाऱ्याने उडून खोल दरीत गेला होता. अभिषेकने गोळा केलेल्या एकूण कचऱ्यापैकी रस्त्याशेजारी पडलेला मोजका कचरा वगळता ९५ टक्के कचरा हा जंगलात उताराच्या बाजूंवर दरीत मिळालेला आहे. माउंटनेरिंगचा कोर्स पूर्ण केलेल्या अभिषेकने गेल्या अनेक वर्षांपासून दरीत गेलेला, अडकून राहिलेला कचरा पहिल्यांदा दरीबाहेर आणला. दरीतला हा कचरा जमिनीवर आणून पुन्हा महादेवगड पॉईंटच्या पार्किंगपर्यंत नेणे वाटते तितके सोपे नव्हते. ज्यांनी आंबोली आणि महादेवगड पॉइंट पाहिला आहे, त्यांना यातले किमान परिश्रम लक्षात यावेत. परिश्रम लक्षात आलेल्या पर्यटकांनी पर्यटनस्थळी कुठेही, कसाही कचरा फेकताना हे काम जरी लक्षात घेऊन जंगल क्षेत्रातील अस्वच्छता टाळली तरी त्यांना ‘कदाचित’ देशसेवा केल्याचं पुण्य पदरात पाडून घेता येईल.
जमलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या, काचा घेऊ शकणाऱ्या मंडळींची अभिषेकला माहिती मिळाली आहे. एकूणपैकी याचाच कचरा ६० टक्क्यांहून अधिक आहे. उर्वरित कचरा हा प्लास्टिक वेस्ट आहे. यासाठीची व्यवस्था लावण्यात आणि भविष्यातील स्वच्छता नियोजनात सध्या अभिषेक आणि सहकारी गुंतलेत. त्यांच्या या खऱ्याखुऱ्या सेवाभावी प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा द्यायला हव्यात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कृत्रिम ऑक्सिजनसाठी वणवण भटकणाऱ्या आपण समाजाने, शासकीय यंत्रणेने अशा पर्यावरणपूरक कार्य साधणाऱ्या प्रयत्नरतांकडे ‘वेडे’ म्हणून बघण्याचे सोडून विशेष सहकार्य भावना दाखवावी. वेळोवेळी आपणहून एक पाऊल पुढे टाकावे, अशी अपेक्षा आहे.
- धीरज वाटेकर, चिपळूण