आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार शेखर निकम यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला आवश्यक असणारी एक्स-रे मशीन व लॅपटॉपची मागणी तत्काळ मान्य केली. तर कडवई ग्रामपंचायतीकडून मागणी केलेली रुग्णवाहिकाही लवकरात लवकर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार शेखर निकम यांनी कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील कामकाज व विलगीकरण कक्षाची पाहणी केली. यावेळी आमदार निकम यांचा सत्कार करण्यात आला. आमदार निकम यांनी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले. निकम यांच्या हस्ते आरोग्य केंद्राला पीपीई किट व मास्कचे वाटप करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी संतोष यादव व निनाद धने यांनी यावेळी आरोग्य केंद्रांसाठी लॅपटॉप व एक्स-रे मशीनची आवश्यकता असल्याचे सांगितले. आमदार निकम यांनी तत्काळ या दोन्ही वस्तू देण्याचे आश्वासन दिले. कडवई ग्रामपंचायतीने रुग्णवाहिकेची मागणी केली होती. ही रुग्णवाहिकाही लवकरात लवकर मिळणार असल्याची ग्वाही आमदार निकम यांनी दिली.
यावेळी कडवईच्या सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य राजन दळवी, संघवी भिंगार्डे, सोमा मादगे, संतोष भडवळकर उपस्थित होते.
---------------------------
संगमेश्वर तालुक्यातील कडवई प्राथमिक आराेग्य केंद्राला आमदार शेखर निकम यांनी भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी संताेष यादव यांनी त्यांचा सत्कार केला.